विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कारवाई; उपसंचालकांचा बॉईज टाऊन व्यवस्थापनाला इशारा

बॉईज टाऊन पब्लिक स्कुलमध्ये शुल्क भरण्यावरून दोन पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरू असून या वादाचे पर्यावसान विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात झाले आहे.

नाशिक: नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा विविध उपक्रमांनी होत असतांना शहरात शैक्षणिक संस्थांमध्ये वादाची घंटा वाजली. बॉईज टाऊन पब्लिक स्कुलमध्ये शुल्क भरण्यावरून दोन पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरू असून या वादाचे पर्यावसान विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात झाले आहे. शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिला आहे.

बॉईज टाऊन पब्लिक स्कुल शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. या कारणावरून त्यांना वर्गात बसू दिले जात नाही. याविषयी पालक सुनील इंगळे आणि ॲड. मृत्यूंजय कुटे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. पालकांनी आपली भूमिका मांडली. नवीन शैक्षणिक वर्षात मुलांना शाळेत पाठवले असता शाळा व्यवस्थापन त्यांना प्रवेशद्वारातूनच घरी पाठवून देत आहे. वास्तविक शाळेचे ४०,८०० रुपये भरण्यास आम्ही तयार आहोत. परंतु, हे शुल्क ज्या कारणासाठी घेण्यात येत आहे, त्याची वर्गवारी द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. परंतु, शाळा विद्यार्थ्यांना बसू देत नाही.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

याबाबत शिक्षण अधिकारी माध्यमिक-प्राथमिक, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार करण्यात आली. शाळेला उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी पत्र दिले. विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हे बालकाच्या मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियमांचे उल्लंघन आहे. शाळेच्या वतीने सुरू असलेला कारभार हा बाल हक्काचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे. याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे सुनावणी झाली. शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून एकही दिवस वंचित ठेवू नये, अन्यथा गंभीर स्वरूपाच्या कारवाईला शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना सामोरे जावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळेचे वेतन तसेच वेतनेतर अनुदान, विद्यार्थ्यांना जोपर्यंत शाळा प्रवेश देत नाही, तोपर्यंत रोखून ठेवण्याची सूचनाही डॉ. चव्हाण यांनी केली आहे.

हे वाचले का?  नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

पालकांना मदत करणार

बॉईज टाऊन शाळा व्यवस्थापनाविषयी तक्रार असलेल्या पालकांनी समोरासमोर येऊन बोलावे. पालकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही. तक्रारदार पालक प्रत्यक्ष भेटत नाहीत. लोकप्रतिनिधी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करतात. पालकांना एका नमुन्यात शुल्क वर्गीकरण अपेक्षित आहे. असे कुठल्याही कायद्यात नाही. केवळ या दोन पालकांना याविषयी तक्रारी आहेत. पालकांना शुल्क सवलतीचा प्रस्ताव दिला आहे. पालकांना मदत करायची आहे. -रतन लथ ( पी. एन. मेहता एज्युकेशन ट्रस्ट बॉईज टाऊन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय)