“सत्यजीत तांबे काँग्रेसबरोबर…”
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघातील निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदावर निवडून आले आहेत. तर, अमरावतीत अद्यापही मतमोजणी सुरु असून, भाजपाचा उमेदवार पिछाडीवर आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील उच्च, मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि पदविधर मतदारांनी भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाला नाकारलं असून, नापास केलं आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “विधान परिषदेच्या पाचपैकी फक्त एका जागेवर भाजपाचा विजय झाला आहे. तो पण एक उमेदवार उधार-उसनवारीचा आहे. कोकणची जागा शेकापाकडे होती, ती शिवसेनेने लढली असती, कदाचित वेगळा निकाल लागला असता. मात्र, महाराष्ट्रातील उच्च, मध्यमवर्गीय सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांनी भाजपाचा पराभव केला आहे. भाजपाला नाकारलं असून, नापास केलं आहे. त्यामुळे उगाच फालतू खुलासे करु नये.”
“महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेलं राजकारण लोकांना मान्य नाही. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकीने लढणार आहोत. नागपूरच्या शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सुटली होती. पण, शिवसेनेने सुधाकर अडबालेंसाठी आपला उमेदवार मागे घेतला. मराठवाड्यात राष्ट्रवादीचे विक्रम काळे जिंकले. नाशिकमध्ये कोणी दावा करु नये, तिथे सत्यजीत तांबे जिंकले आहेत. आम्ही शुभांगी पाटलांना आम्ही पाठिंबा दिला होता आणि त्या झाशीच्या राणीसारखं लढल्या. पण, पूर्ण खात्री आहे, सत्यजीत तांबे काँग्रेसबरोबर राहतील,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
“विदर्भातील जनता भाजपाच्या कारभाराला कंटाळली आहे. नागपूरमध्ये यापूर्वीही पदवीधर मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला असून, काँग्रेसचे अभिजीत वंजारी निवडून आले आहेत. शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे अडबाले जिंकून आले आहेत. खोक्याचं राजकारण आम्हाला मान्य नाही, असा स्पष्ट संकेत निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिला आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.