आमदार रोहित पावार यांनी विरोधकांना काढला शाब्दिक चिमटा!
देशात करोनाचा उद्रेक सुरू आहे. दररोज चार लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. करोनाची दुसरी लाट हळूहळू संपूर्ण देशात पसरत आहे. करोनाचा हॉटस्पॉट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात होतं. मात्र महाराष्ट्राने लॉकडाउनचा निर्णय घेत करोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. काल राज्यात नवीन ८२२६६कोरोना बाधित रुग्ण बरे झाले तर ५३६०५ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्य सरकार करत असलेल्या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने देखील मुंबईमध्ये सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले होते. मात्र विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत करोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पावार यांनी विरोधकांना शाब्दीक चिमटा काढला आहे. “कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!”, असा सल्ला रोहित पवारांनी विरोधकांना दिला.
तसेच विरोधक कोविड रूग्णांच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत राज्य सरकारवर आरोप करत असतात, याला देखील रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. “कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!”, असे ते म्हणाले.
मोदी यांनी राज्याच्या यंत्रणेचे केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत राज्यातील करोना स्थितीची माहिती घेतली. करोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दांत मोदी यांनी राज्याच्या यंत्रणेचे कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: प्राणवायूच्या बाबतीत राज्याला अधिक बळ मिळावे, अशी विनंती मोदी यांना केली. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकार करीत असलेल्या तयारीची माहितीही ठाकरे यांनी दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे करोना लढ्यात राज्याला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, राज्याच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानले.
मुंबई मॉडेलचे सुप्रीम कोर्टाकडून कौतुक
दिल्लीसोबतच अन्य राज्यांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भात केंद्र सरकारला आदेश देऊनही केंद्राने त्याची दखल न घेतल्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर सुनावणी झाली. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महापालिकेने करोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं. न्या. चंद्रचूड यांनी मुंबई महापालिकेने केलेल्या कामासंदर्भात प्रसारमाध्यमांद्वारे माहिती मिळाली असं सांगितलं. तसं काही देश स्तरावर आणि राज्य स्तरावर शक्य आहे, का याची चाचपणी करण्याची गरज आहे, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं. इतकचं नाही तर मुंबई महापालिकेचा हा संदर्भ वापरून देशामध्ये आणि राज्यांमध्ये कशापद्धतीने करोना नियंत्रणामध्ये आणता येईल, यासंदर्भात भाष्य केले.