विश्लेषण : टोमॅटोंची अस्मानी दरवाढ का सुरू आहे?

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये किलोवर गेला आहे.

दत्ता जाधव

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये किलोवर गेला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दर घसरणीची शक्यता दिसत असतानाच पुन्हा दरवाढ का होत आहे याचा आढावा…

टोमॅटोच्या दराची सद्य:स्थिती काय?

राजधानी दिल्ली आणि परिसरात बुधवारी, २ ऑगस्ट रोजी टोमॅटोचे दर २५० रुपये किलोवर गेले होते. दिल्लीतील मदर डेअरीच्या विक्री केंद्रावर २५९ रुपयांनी विक्री सुरू होती, तर चंडिगढ आणि उत्तराखंडमध्ये टोमॅटो थेट ३०० रुपये किलोवर गेला आहे. पुणे, मुंबईत १०० ते १५० रुपये दरांनी किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री सुरू आहे. दिल्लीत झालेल्या दरवाढीला केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. दिल्लीसह देशभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे तीव्र दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे.

टोमॅटोची आवक का घटली?

हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही प्रमुख टोमॅटोउत्पादक राज्ये आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात या प्रमुख टोमॅटोउत्पादक राज्यांत मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. कर्नाटक, तेलगंणा, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस झाला होता. महाराष्ट्रात नारायणगाव, नाशिक, कोल्हापूर भागात संततधार सुरू असल्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोचे पीक वाया गेले. संततधार पावसामुळे दर्जावर परिणाम झाला आहे. तोडणी, वाहतुकीतही अडथळे येत असल्यामुळे टोमॅटोचा बाजार समित्यांना होणाऱ्या पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या अन्य भागातही टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. बाजार समित्यांमध्ये पुरेशी आवक होत नसल्यामुळे दरवाढीचा कल कायम आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

केंद्र सरकारच्या उपाययोजना अपयशी?

दिल्लीतील टोमॅटोची टंचाई, दरवाढ टाळण्यासाठी आणि दिल्लीकरांना सवलतीच्या दरात टोमॅटो मिळावा म्हणून केंद्र सरकार थेट टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला (एनसीसीएफ) केंद्राने तातडीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला टोमॅटो दिल्लीत सवलतीच्या दराने म्हणजे ८५ रुपये किलो दराने विकला जात होता. पण, सवलतीच्या दराने टोमॅटोची विक्री करण्यास नाफेड आणि एनसीसीएफला अपेक्षित प्रमाणात टोमॅटो मिळला नाही. शिवाय थेट शेतातून खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाही या संस्थांकडे नसल्यामुळे टोमॅटोउत्पादक भागातील बाजार समित्यांमधून खरेदी करण्यास सुरुवात केली होती. पण, आता स्थानिक बाजार समित्यांमध्येही टोमॅटोची आवक फारशी होत नसल्यामुळे केंद्र सरकारच्या उपाययोजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

टोमॅटोची लागवड वर्षभर होते?

देशाच्या कानाकोपऱ्यात वर्षभर टोमॅटोलागवड होत असते. टोमॅटोचे उत्पादन देशातील सर्वच राज्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात होते. स्थानिक पातळीवर मागणीनुसार लागवड आणि विक्री होत असते. देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशाचा वाटा ५५ टक्क्यांहून जास्त आहे. राज्यनिहाय टोमॅटोचा कालावधी भिन्न आहे. तरीही टोमॅटोकाढणीचा काळ डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात टोमॅटोचे उत्पादन कमी असते. महाराष्ट्राचा विचार करता राज्यात एका वर्षात ७० हजार हेक्टरवर लागवड होते. त्यांपैकी ४० हजार हेक्टर खरिपात, तर ३० हजार हेक्टरवर रब्बी व उन्हाळी हंगामात लागवड होते. राज्यात यंदाचा उन्हाळा कडक होता. जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे अपेक्षित टोमॅटोलागवड होऊ शकली नाही. जुलैअखेर राज्यात सरासरीच्या पन्नास टक्केच म्हणजे २२ हजार हेक्टरवरच लागवड झाली आहे. ही लागवड प्रामुख्याने नाशिक, नारायणगाव भागात झाली आहे. साधारणपणे जुलै महिन्यात देशभर पाऊस असतो. त्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होतो. काढणी, वाहतूक अडचणीची ठरते.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

ऑगस्टअखेरीस दिलासा?

मेअखेरीस ५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो जूनच्या पहिल्या आठवड्यात २५ ते ४० रुपये किलोवर गेला. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात तो ९० ते १२० रुपये किलो होता. जुलैमध्ये टोमॅटोचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलोवर टिकून होते. आता त्यात वाढ होऊन २५९ ते ३०० रुपयांवर गेले आहेत. टोमॅटोउत्पादक, व्यापारी १५ ऑगस्टनंतर टोमॅटोच्या दरात घसरण सुरू होईल, असे सांगत होते. आता टोमॅटोचे दर सामान्यांच्या आवाक्यात येण्यास ऑगस्टअखेर उजाडेल, असे सांगितले जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर टोमॅटोची नव्याने लागवड सुरू झाली आहे. नव्या लागवडीचे टोमॅटो बाजारात येण्यास ६० ते ६५ दिवसांचा काळ जातो. त्यामुळे ऑगस्टअखेरीस ग्राहकांना टोमॅटोच्या दराचा दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.