विश्लेषण: बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी का?

निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.

दत्ता जाधव

केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. निर्यातबंदीचा निर्णय सरकारला का घ्यावा लागला. या निर्णयाचे देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तांदळाच्या बाजारपेठेवर काय परिणाम होतील, त्या विषयी…

बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी का?

बिगर बासमती (उकडलेला, स्टीम तांदूळ वगळून) पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर २० जुलै २०२३ पासून बंदी घातली आहे. मात्र, निर्यातबंदीच्या दिशेने सप्टेंबर २०२२ पासूनच सुरुवात झाली होती. देशांतर्गत बाजारात तांदळाची उपलब्धता कायम राहून, दरवाढ नियंत्रणात राहण्यासाठी ८ सप्टेंबर २०२२ रोजी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात कर लादला होता. त्यानंतरही बिगर बासमती तांदळाची निर्यात सुरूच होती. सप्टेंबर २०२१ ते मार्च २२ मध्ये ३३.६६ लाख टन निर्यात झाली होती. निर्यात कर लागू केल्यानंतरही त्यात वाढ होऊन सप्टेंबर २०२२ ते मार्च २३ या काळात ४२.१२ लाख टन निर्यात झाली आहे. एप्रिल २०२३ ते जून २०२३ या काळात १५.५४ लाख टन निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत निर्यातीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली होती. निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.

मोसमी पाऊस, एल-निनोमुळे सावध पाऊल?

यंदा देशात मोसमी पाऊस उशिराने दाखल झाला. शिवाय देशभरात सक्रिय होण्यास जुलै मध्य उजाडला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोसमी पावसाने सरासरी भरून काढली असली तरीही देशाच्या काही भागात पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे. १५ जुलैपर्यंत भात लागवड सरासरीपेक्षा दहा टक्के कमीच होती. २१ जुलैअखेर देशात १८०.२० लाख हेक्टरवर भात लागवड झाली आहे. जी मागील वर्षाच्या (१७५.४७ लाख हेक्टर) तुलनेत वाढली आहे. तांदूळ उत्पादक किनारपट्टीवरील राज्यांसह पंजाब, हरियाणा, छत्तीसगडसारख्या राज्यात भात लागवड सुरू झाली आहे. पण, उशिराने होत असलेली भात लागवड अपेक्षित उत्पन्न देईल का, या विषयी जाणकार साशंक आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. जगभरातील संस्थांनी यंदा एल-निनो सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, एल-निनो सक्रियही झाला आहे. त्याचा परिणाम मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यावर म्हणजे जुलैनंतर दिसून येण्याची शक्यता आहे. एन-निनोमुळे पाऊस कमी होऊन देशातील कृषी उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राने यापूर्वीच तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातलेली आहे.

बिगर बासमती तांदूळ का महत्त्वाचा?

देशात मागील वर्षी १२३० लाख टन एकूण तांदूळ उत्पादन झाले होते. देशाच्या एकूण तांदूळ निर्यातीत २५ टक्के वाटा बिगर बासमती तांदळाचा असतो. देशातून महिन्याला सरासरी पाच लाख टन बिगर बासमती तांदूळ निर्यात होतो. २०२०-२१ मध्ये बिगर बासमती ३५,५०० कोटी रुपये किमतीचा १३० लाख टन बिगर बासमती तांदूळ निर्यात झाला होता. २०२१-२०२२ मध्ये ४५ हजार कोटी रुपये किमतीचा १७० लाख टन तांदूळ निर्यात झाला होता. २०२२-२४ मध्ये ३५ हजार कोटी रुपये किमतीचा १२५ लाख टन तांदूळ निर्यात झाला होता. देशातून इंद्रायणी, आंबेमोहोर, सुरती कोलम, सोनामसुरी आदी वाणांचा तांदूळ जगभरात निर्यात होतो.

तांदळाच्या जागतिक बाजारपेठेवर काय परिणाम?

भारतीय तांदळाला जगभरातून प्रचंड मागणी असते. यंदा त्यात वाढच झाली आहे. जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. तांदूळ उत्पादनातही भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे. युक्रेन युद्ध आणि चीन-पाकिस्तानातील खराब हवामानाचा फटका तेथील उत्पादनाला बसला आहे. पाकिस्तानात तांदूळ उत्पादन ३१ टक्क्यांनी घटणार असल्याचा अमेरिकी कृषी विभागाचा अंदाज आहे. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जागतिक बाजारपेठेत मोठे पडसाद उमटू लागले आहेत. अमेरिका, कॅनडामध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. बंदीचा निर्णय कळताच त्या देशातील मॉल्समध्ये तांदूळ खरेदीसाठी भारतीयांनी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी रांगा लावून तांदूळ खरेदी करायला सुरुवात केली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये तांदूळ खरेदीसाठी झुंबड उडाल्याची छायाचित्रे समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

देशांतर्गत बाजारातील चित्र काय?

या वर्षी भारतातही बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे बासमती व बिगर बासमती तांदळाचे देशांतर्गत भावही उच्चांकी पातळीवर गेले आहेत. महाराष्ट्रातील इंद्रायणी तांदळाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात इंद्रायणी तांदूळ ४५ ते ५० रुपये किलो होता, तो आता ६० रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने देशांतर्गत बाजारात बिगर बासमती तांदूळ अर्थात, सर्वसामान्यांना लागणारा मसुरी, सोनामसुरी, कोलम, आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळाच्या दरवाढीवर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदीमुळे बासमती तांदळाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. २६ जुलैअखेर बासमती (अख्खा) : ११,००० ते १२,५०० रुपये (खुला – प्रति क्विंटल), मसुरी तांदूळ : ३५०० ते ३७००, कोलम – ५५०० ते ६०००, सोनामसुरी ४७०० ते ५०००, आंबेमोहर ८००० ते ८५०० (प्रति क्विंटल) असे सध्याचे दर आहेत.

निर्यातीवर काय परिणाम झाले?

भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. देशातील निर्यातदारांना तब्बल २० लाख टन तांदूळ निर्यातीचे करार रद्द करावे लागले आहेत. या तांदळाची किंमत सुमारे १०० कोटी डॉलर आहे. भारताने २० जुलैला निर्यातबंदी केल्यानंतर केवळ चारच दिवसांमध्ये तांदळाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति टन ५० ते १०० डॉलरने वाढले आहेत. देशातील तांदळाचे वाढते भाव लक्षात घेऊन सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी घालेल, अशी भीती निर्यातदांना होती. पण, सरकार इतक्या लवकर निर्यातीवर बंदी घालेल, याचा अंदाज निर्यातदारांना नव्हता. निर्यातबंदी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होऊ शकते, असा अंदाज होता. या नुसार निर्यातदारांचे नियोजन होते. पण सरकारने अचानक बंदी घातल्यामुळे निर्यातदारांवर करार रद्द करण्याची वेळ आली आहे. सरकारने निर्यातबंदी लागू केल्यानंतर करार केलेल्या तांदळाचीही निर्यात होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निर्यातदारही अडचणीत आले आहेत.

जगाची तांदळाची गरज कोण भागविणार?

भारताने तांदूळ निर्यातबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे भाव वाढले आहेत. जगभरातील खरेदीदार देशांनी, व्यापाऱ्यांनी भारताच्या निर्यातबंदीनंतर आता थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानकडे मागणी केली आहे. पण सध्या थायलंड आणि पाकिस्तान तांदूळ निर्यात करण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे व्हिएतनामधूनच निर्यात सुरू आहे. परिणामी व्हिएतनामच्या तांदळाला जगभरातून मागणी वाढली आहे. मागील काही दिवसांत तांदळाचे भाव टनामागे ५० ते १०० डॉलर प्रति टनाने वाढले आहेत. तांदळाच्या काही वाणाचे भाव आधीच ६०० डॉलर प्रति टनांवर पोचले आहेत. त्यात आणखी वाढ होऊ शकते.