विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : निश्चलची रौप्य कामगिरी

भारताची युवा नेमबाज निश्चलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये रौप्यपदक जिंकले.

पीटीआय, नवी दिल्ली

भारताची युवा नेमबाज निश्चलने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये रौप्यपदक जिंकले. तिने स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताला दुसरे पदक मिळवून दिले. निश्चलने आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत ही कामगिरी केली.

निश्चलने अंतिम सामन्यात ४५८.० गुणांची कमाई केली. ती नॉर्वेची तारांकित नेमबाज जेनेट हेग डुएस्टेडनंतर दुसऱ्या स्थानी राहिली. डुएस्टेड एअर रायफलची सध्याची युरोपियन विजेता आहे, तसेच तिच्या नावे पाच सुवर्णपदकासह ‘आयएसएसएफ’ विश्वचषक स्पर्धेत एकूण १२ पदके आहेत. ती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी होती. निश्चलने यादरम्यान महिला थ्री पोझिशनच्या पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. ‘‘विश्वचषक स्पर्धेत प्रथमच मी अंतिम फेरीत सहभाग नोंदवला आणि पदक जिंकण्यात मला यश मिळाले. त्यामुळे या कामगिरीने मी आनंदी आहे,’’ असे निश्चल म्हणाली.

हे वाचले का?  Wayanad Landslides Update : केरळच्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या २५६ वर; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता!

निश्चलने ५८७ गुणांसह पात्रता फेरीत स्थान मिळवले. यापूर्वीचा पात्रता फेरीतील राष्ट्रीय विक्रम अंजुम मुद्गिल आणि आयुषी पोदार यादेखील पात्रता फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या. पात्रता फेरीत निश्चलने ५९२ गुणांची कमाई केली व अंजुमचा विक्रम मोडीत काढला. अंजुम ५८६ गुणांसह दहाव्या स्थानी राहिली. आयुषी ५८० गुणांसह ३५व्या स्थानी राहिली. अंतिम फेरीत अनेक शीर्ष खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ज्यामध्ये डुएस्टेडशिवाय चीनची जागतिक विजेता वानरू मियाओ, डेन्मार्कची स्टेफनी ग्रुंडसोई, इटलीची ऑलिम्पिकपटू सोफिया सेकेरेलो यांचा समावेश होता. निश्चलने अखेपर्यंत डुएस्टेडला चांगली टक्कर दिली. मात्र, डुएस्टेडने अनुभवाच्या जोरावर ४६१.५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताचा गुरप्रीत सिंग ५७४ गुणांसह १५व्या स्थानी राहिला. त्यामुळे भारताच्या चमूने या स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. यापूर्वी, इलावेनिल वलारिवनने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.