एकलहरे वीज केंद्रातील तांत्रिक बिघाडाचा फटका नाशिकमधील रहिवाशांसह सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना बसला. पंपिंग केंद्रात वीज नसल्याने सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना तीन दिवस पाणी पुरवठा होऊ शकला नाही.
नाशिक – एकलहरे वीज केंद्रातील तांत्रिक बिघाडाचा फटका नाशिकमधील रहिवाशांसह सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना बसला. पंपिंग केंद्रात वीज नसल्याने सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना तीन दिवस पाणी पुरवठा होऊ शकला नाही. उद्योजकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना टँकरने पाण्याची व्यवस्था करावी लागली. भविष्यात पुन्हा ही स्थिती उद्भवू नये म्हणून मऔविमने पर्यायी व्यवस्था करावी, सिन्नरसाठी स्वतंत्र जनित्र देण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्याने सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे त्रस्तावलेले आहेत. यात सलग तीन दिवस पाणी पुरवठाच खंडित झाल्याने अडचणीत भर पडली. या संदर्भात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि उद्योजकांनी मऔविमचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे यांची भेट घेतली. सिन्नर निमाचे पदाधिकारी किरण वाजे ,सुधीर बडगुजर, विश्वजित निकम, प्रविण वाबळे यांनी वसाहतीतील स्थिती मांडली. सिन्नर वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या नाशिकरोड येथील रोहित्रात बिघाड होता. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे झांज्जे यांनी लक्षात आणून दिले. उद्योजकांना सामोरे जावे लागलेल्या अडचणींची माहिती दिल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला. पंपिंग केंद्रातील एक पंप तातडीने सुरू करण्यात यश आले. दुसरा पंपही सुरू करून सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्राचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे झांज्जे यांनी सांगितले.
भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून जनित्राची व्यवस्था करावी, असेही उद्योजकांनी सुचवले. त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सिन्नर औद्योगिक वसाहतीत जे सेक्टरसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यासाठी १३.९३ हेक्टर औद्योगिक क्षेत्र वगळून रस्ता करण्याबाबत चर्चा झाली. सांडपाण्याचा निचरा, विजेचा लपंडाव, रस्त्यांची दुरवस्था याबाबतही व्यापक चर्चा झाली. सातपूर व अंबड वसाहतीतील नाले साफसफाई, रस्ते दुरुस्ती, सातपूर येथील सिएटचा पूल पाडून ठेवल्याने वाहतुकीला होणारा अडथळा आदी प्रश्न मांडले गेले. याबाबत महापालिकेबरोबर बैठक घेऊन लवकर हा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना निमा पदाधिकाऱ्यांनी केली.