पण या निवडणुकीचा निकाल पुढच्या आठवडयात लागणार?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अजूनही सुरुच आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन विजयाच्या समीप पोहोचले आहेत. जो बायडेन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होटस मिळाले आहेत. व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी त्यांना अजून सहा मतांची आवश्यकता आहे. असोसिएटेड प्रेसनुसार एरिझोना, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये बायडेन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही तिन्ही राज्ये इलेक्टोरल व्होटसच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत.
नेवाडामध्येही बायडेन सरशी साधू शकतात, असे चित्र आहे. व्हाइट हाऊसमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक असलेली सहा मते बायडेन यांना नेवाडामधून मिळू शकतात. पण आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सध्या २१४ इलेक्टोरल व्होटस आहेत. पेन्सिलवेनिया, नॉर्थ कॅरोलिन आणि जॉर्जिया या राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. पण ट्रम्प यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. जॉर्जिया आणि पेन्सिलवेनियामध्ये मतांचं जे अंतर आहे, ते बायडेन भरुन काढतायत.
काल ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजयाचा दावा केला होता, त्याचवेळी त्यांनी बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत मतमोजणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात जाण्याची धमकी दिली होती. विसकॉनसीनच्या अनेक काऊंटीमध्ये गैरप्रकार झाले असून तिथे ट्रम्प यांची टीम फेर मतमोजणीची मागणी करणार आहे.