“व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं…”, ठाकरे गटाचा टोला

गुजरात सरकारने मुंबईत व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ या रोड शोचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

गुजरात सरकारने आज (बुधवार, ११ ऑक्टोबर) मुंबईत व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे या ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ रोड शो’चं नेतृत्व करणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजराला नेण्यासाठी, गुजरातमध्ये आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या कार्यक्रमाला हजर असणार आहेत, यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका होऊ लागली आहे.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जाणार हाच अंगार आणि भंगारमधला फरक आहे.”

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. याचदरम्यान, ‘एकनाथ शिंदे अंगार हैं, बाकी सब भंगार हैं’, अशी घोषणा शिंदे गटातील नेत्यांनी दिली आहे. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं. संजय राऊत म्हणाले, व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं जावं लागतं. इथे व्हायब्रंट महाराष्ट्राचा आत्मा काढून गुजरातला पाठवला जातोय. जो महाराष्ट्र या देशात उद्योगक्षेत्रात सर्वाधिक व्हायब्रंट होता, त्या महाराष्ट्राला संपवून, मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय?

हे वाचले का?  Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

खासदार संजय राऊत म्हणाले, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच का तुमचा अंगार? याच्यावर तुम्ही उत्तर द्या. गुजरातसाठी मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतोय, मग महाराष्ट्रासाठी तुम्ही (एकनाथ शिंदे) गुजरातला जाताय का? अहमदाबादला, लखनौला किंवा दिल्लीला जाताय का? महाराष्ट्रासाठी कधी गेला आहात का? गुजरातसाठी जाताय, कारण तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे. आम्ही आमच्या गळ्यात कोणाचे पट्टे बाधून घेतले नाहीत.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?