राज्यात आशीष झांट्ये पहिला
NEET Exam Results 2020 : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. ओडिशा येथील शोएब आफताब आणि दिल्ली येथील आकांक्षा सिंग हे पैकीच्यापैकी गुण मिळवून (७२० गुण) या परीक्षेत देशात पहिले आले आहेत. राज्यात आशीष झांट्ये पहिला आला आहे. देशातील टॉप ५ मध्ये तीन मुलींचा समावेश आहे.
राजस्थानमधील कोटा येथील एलन करियर इंस्टीट्यूटमध्ये कोचिंग करणाऱ्या शोएबने म्हटले की, “करोना विषाणूमुळे कोटामधील सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले होते. तेव्हा आई आणि बहिणीसोबत मी तिथेच होतो. त्यावेळी कोचिंग क्लासेस सुरुच ठेवण्यात आली. याचा मला फायदा झाला. दररोज १५ तास अभ्यास करत होतो.” वैदकिय शिक्षण पर्ण झाल्यानंतर कार्डियेक सर्जन व्हायचं असल्याचं शोएबने सांगितलं.
ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर नीट परीक्षेचा निकाल पाहता येईल. राज्यात प्रथम आलेल्या आशीष झांट्ये (७१० गुण) हा राष्ट्रीय गुणवत्ता यादीत १९ व्या स्थानावर आहे. देशातील पहिल्या ५० विद्यार्थांमध्ये राज्यातील फक्त चार विद्यार्थांचा समावेश आहे.
राष्ट्रीय परीक्षा कक्षाने यंदा १३ सप्टेंबर रोजी नीट घेतली होती, तर या परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १४ ऑक्टोबर रोजी झाली. देशात यंदा १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १३ लाख ६६ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून त्यातील ७ लाख ७१ हजार ५०० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. नीट परीक्षेत राज्यातील ८ ते १० हजार जागांसाठी साधारण ८० हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश पात्रता गुण साधारण ५० गुणांनी वाढले आहेत.