“शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर…,” संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचं नाव पुढे असल्याची चर्चा आहे. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास काय भूमिका असेल यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

“आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु,” असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळलं वृत्त –
राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.