शहरातील झाडांची पडझड

रिमझिम स्वरूपात संततधार सुरू असल्याने धरणांच्या जलसाठय़ात संथपणे वाढ होत आहे.

संततधार पावसाचा परिणाम; पालखेड धरणातून विसर्ग

नाशिक : रिमझिम स्वरूपात संततधार सुरू असल्याने धरणांच्या जलसाठय़ात संथपणे वाढ होत आहे. नाशिक शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ८२ टक्के जलसाठा झाला. तर पालखेडमध्ये ८० टक्के साठा झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ४०० क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळली. जुना गंगापूर नाका परिसरात चोपडा लॉन्सलगत रस्त्यावर झाड कोसळल्याने एका बाजूची वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली.

मागील २४ तासांत जि’ाात ४०९ मिलिमीटरची नोंद झाली. गुरुवारी शहरात सहा ते सात ठिकाणी झाड वा फांद्या उन्मळून पडल्या. गंगापूर नाका-हनुमानवाडी रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने एका बाजूची वाहतूक बंद करावी लागली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्र्यंबक रस्त्यावरील वेद मंदिरालगतच्या कॉलनी रस्त्यावर झाड कोसळले. नाशिक तालुक्यात केवळ चार मिलिमीटरची नोंद झाली. ग्रामीण भागात वेगळे चित्र नव्हते. त्र्यंबकेश्वर (३४), इगतपुरी (१६), मालेगाव (२८), नांदगाव (५७), सुरगाणा (६३), पेठ (२३), निफाड (२२) असा पाऊस झाला. चांदवड, देवळा, सिन्नर या तालुक्यांत जेमतेम पाऊस झाला. बरेच दिवस पावसाने दडी मारली होती. खरिपाची पिके हातची जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

जलसाठय़ात संथपणे वाढ

जिल्हातील लहान मोठय़ा २४ धरणांमध्ये सध्या ३७ हजार ७२३ अर्थात ५७ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ६६ टक्के इतके होते. गंगापूरच्या जलसाठय़ात २४ तासांत केवळ दोन टक्क्यांनी वाढ झाली. पालखेड धरणात ८० टक्के साठा झाला आहे. धरण परिचालन नियमावलीनुसार ऑगस्टमध्ये इतकाच जलसाठा ठेवता येतो. त्यामुळे या धरणातून सायंकाळी ३९१ क्युसेक्सने कादवा नदीत विसर्ग करण्यात आला. भावली व वालदेवी ही दोन्ही धरणे आधीच भरलेली आहेत. त्यांच्या सांडव्यातून अनुक्रमे ७३ आणि ६५ क्युसेक्सने पाणी वाहत आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून ६०६ क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.