बंदला संमिश्र प्रतिसाद, महामार्गावर ‘रास्ता रोको’
बंदला संमिश्र प्रतिसाद, महामार्गावर ‘रास्ता रोको’
नाशिक : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात समविचारी पक्ष, शेतकरी संघटना यांनी एकत्रित येत देशपातळीवर मंगळवारी देशव्यापी बंदची हाक दिली. या बंदला शहरासह जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्य़ातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. बंदचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह सिडको, पंचवटी, सातपूर, नाशिक रोड परिसरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फू र्तीने दुकाने बंद ठेवली. सकाळी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना, माकप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह अन्य समविचारी पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. यावेळी के ंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी आंबेडकर पुतळ्यापासून शालिमारच्या दिशेने आपला मोर्चा वळवला असता पोलिसांनी शालिमार तसेच मेनरोड परिसरात मोर्चा पुढे नेण्यास मज्जाव के ला. पोलिसांनी दोरी बांधत आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न के ला. मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांचा विरोध न जुमानता आंदोलनकर्ते पुढे गेले. आपकडूनही आंदोलन करण्यात आले.
बंदमुळे राज्य परिवहनने बससेवेच्या काही फे ऱ्या रद्द के ल्या. याची प्रवाशांना माहिती नसल्याने त्यांची गैरसोय झाली. शहर बस सेवेच्या काही फे ऱ्या रद्द झाल्या.
मनमाड येथे बाजार समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. चांदवड येथील चौफु ली परिसरातही शेतकऱ्यांनी रास्तारोको के ला.
दिंडोरी, पेठ, सुरगाणा येथेही शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. सुरगाण्यात तीन कृषी कायद्याविरोधात आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंब्याचे निवेदन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, किसान सभा आणि भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांच्या वतीने नायब तहसीलदार सुरेश बकरे यांना देण्यात आले. सुरगाण्यात सर्व व्यवहार बंद होते. माकप, किसान सभा, डीवायएफआय, एसएफआय, जनवादी महिला संघटना यांच्या वतीने सापुतारा-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील नागझरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सटाणा शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिका?ऱ्यांकडून दबाव आणून दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त के ली. महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फे री काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले.काही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी बहुतांश व्यापाऱ्यांना दुकाने फोडण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. बाजार समिती, दैनंदिन भाजीबाजार बंद ठेवण्यात आले होते. नाशिक जिल्हा वकील फेडरेशनचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील आवारात कृषी देयकाची होळी करण्यात आली.
मालेगाव शहरासह तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच हॉकर्स युनियनतर्फे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना स्वतंत्ररीत्या निवेदने देण्यात आली. शेतीतज्ज्ञ, शेतकरी नेते, विरोधी पक्ष यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने हा कायदा अत्यंत घाईघाईने लागू केल्याने त्याविरोधात भारतातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे हॉकर्स युनियनने म्हटले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा व्यापारी संघटना, हमाल-मापारी, भाजीपाला विक्रे ते या बंदमध्ये सामील झाले होते. देवळा तालुक्यातील उमराणे येथे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव भवर तसेच मंडळ अधिकारी पाटील यांना निवेदन देण्यात आले.
बंदमुळे बसमध्ये तुरळक प्रवासी; राज्य परिवहनच्या तोटय़ात भर
नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे राज्य परिवहनच्या बसगाडय़ांमध्ये तुरळक प्रवासी असल्याचे पाहायला मिळाले. पिंपळगाव, कळवण, पेठ आगाराबाहेर आंदोलन झाल्यामुळे त्या आगारातील बस सेवा काही काळ थांबवावी लागली. कमी प्रवासीसंख्येमुळे दुपापर्यंत नुकसानीत बस चालवाव्या लागल्या.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांसह प्रमुख राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली. शहरासह जिल्ह्य़ात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या रास्ता रोकोची झळ राज्य परिवहनच्या वाहतुकीला बसली. टाळेबंदीचे र्निबध शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यत एसटी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सद्य:स्थितीत दैनंदिन ५५० बसगाडय़ांमार्फत तितक्याच फेऱ्या मारल्या जातात. यामध्ये शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४० बसचाही अंतर्भाव आहे. बंदच्या दिवशी नेहमीप्रमाणे राज्य परिवहनने बससेवेची तयारी केली होती. परंतु, आंदोलनामुळे अनुचित प्रकार घडल्यास बसगाडय़ांचे नुकसान होऊ नये म्हणून तसेच रास्ता रोकोमुळे नियोजनात बदल करण्यात आला.
पिंपळगाव, कळवण आगाराच्या बाहेर आंदोलन झाल्यामुळे काही काळ बस बाहेर पडू शकल्या नाहीत. सकाळपासून दुपापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील बसमध्ये तुरळक प्रवासी होते. बुधवारी लग्नतिथी असल्याने प्रवासी संख्येत वाढ होईल असे गृहित धरून बसच्या दैनंदिन फेऱ्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले.