शहर आणि परिसरातील किमान तापमानात घट

शहर आणि परिसरातील किमान तापमानात घट
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 1 मिनिट )

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेसदृश स्थितीमुळे हवामान विभागाने ४ डिसेंबरपर्यंत नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला असून, १२ ते १३ डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

निरभ्र आकाश, कोरडे वातावरण, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात झपाट्याने घट झाली होती. त्यामुळे शहर आणि परिसरातही गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. प्रामुख्याने दिवसाच्या तुलनेत रात्री, पहाटे थंडीचा कडाका अनुभवला आहे. थंडीमुळे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोट्याही पेटवण्यात आल्याचे चित्र होते. त्या दरम्यान यंदाच्या हिवाळी हंगामातील शहरातील तापमान ९.५ अंश सेल्सियसपर्यंत घसरले होते.

मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीमुळे २१-२२ नोव्हेंबरपासून हवामानात बदल होऊन तापमानात वाढ झाली होती. लागोपाठ आलेल्या चक्रीवादळांनंतर आता पुन्हा एकदा तापमानात घट होत असून, गेल्या पाच दिवसांत तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसने घट झाल्याचे दिसून येत आहे.

See also  माजी शिक्षण उपसंचालकांचे असेही उद्योग