शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

शालेय शिक्षण विभागाच्या बदलत्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

सावंतवाडी:  शालेय शिक्षण विभागाच्या बदलत्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षणासाठी स्थलांतर वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषदेच्या २० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे तीनशेपेक्षा जास्त शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक (७० वर्षाची वयोमर्यादा ) किंवा डीएड बीएड धारकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० पटसंख्या असलेल्या शाळांची ८४८ एवढी संख्या आहे तर दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची ५११ एवढी संख्या आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची चर्चा करण्यात येत असताना आता कमी पटसंखेच्या शाळांमध्ये कंत्राटी गुरुजींची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संस्थांच्या शाळांमधील पदे कायमची संपुष्टात येणार आहे. तर कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते. राज्याच्या शिक्षण विभागाने समुह शाळा हा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला होता परंतु गाव तेथे शाळा ही संकल्पना मोडीत निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्व स्तरातून विरोध झाला त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षण नेमण्याचा निर्णय घेतला आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबर डी एड बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही यात कंत्राटी शिक्षक म्हणून संधी देण्यात येणार आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

या नेमणूक देण्यात येणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना १५ हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ५ सप्टेंबर २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शासन निर्णय निर्गमित केला आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी आदेश आल्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील संच मान्यतेनुसार ८४८ जिल्हा परिषद शाळांची संख्या वीस पट संख्येची आहे तर दहा पट संख्येची ५११ एवढी आहे. या शाळांची संख्या चालू वर्षाच्या संच मान्यतेनुसार वाढणार आहे त्यामुळे शाळा मधील एक पद कमी करून त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

जिल्ह्यातील २० पटसंख्या शाळा दोडामार्ग ६९,सावंतवाडी ११५,वेंगुर्ला ३०, कुडाळ ११९, मालवण १३९, कणकवली १२७, देवगड १३०, वैभववाडी ६९ म्हणून जिल्ह्यात ८४८ शाळा २० पट संख्येच्या आहेत तर दहा पटसंख्या च्या ५११ शाळा असून त्यांची तालुका निहाय संख्या अशी देवगड ७८, दोडामार्ग ३८,कणकवली ८३, कुडाळ ६७, मालवण ८७,  सावंतवाडी ६१, वैभववाडी ५०, वेंगुर्ला ४७ आहे . आता मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्याच्या शाळावर प्रत्येकी एक डीएड धारकांचा शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक देण्यासंदर्भात शासन निर्णय झाला आहे .परंतु सध्या कार्यरत शिक्षकापैकी त्या शिक्षकांना तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यावर निवड कोणी कशा पद्धतीने करायची?  या संदर्भात शिक्षण संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार काही दिवसात कारवाई केली जाईल असे शिक्षक विभाग कडून स्पष्ट करण्यात आले.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू