शाळांची दुसरी घंटा…

करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून हे वर्ग सुरू करण्यात आले.

नववी ते १२ नंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू; विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उत्साह

पालघर :  पालघर जिल्ह्यात नववी बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. ऑनलाइन शिक्षणात हरविलेली शाळा पुन्हा एकदा पूर्वीसारखी अनुभवायला मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर  बुधवारपासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांची दारे उघडी झाली. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून हे वर्ग  सुरू करण्यात आले. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद व इतर आस्थापनाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी सुमारे ८० हजार पालकांनी संमती दर्शवली आहे. तर  सुमारे ३० हजार पालकांनी संमती नाकारली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत जिल्हा परिषद व इतर आस्थापनांच्या एक हजार ६३२ शाळा सुरू झाल्या आहेत.  या शाळांमध्ये ६४ हजार ६६२ विद्यार्थी उपस्थित होते. याउलट शाळेत न आलेले मात्र ऑनलाइन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून ती ३८ हजार इतकी आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे नियोजन करण्यात येत होते.  विद्यार्थी रांगेने येत हात निर्जंतुकीकरण करत होते. शारीरिक अंतर पाळत विद्यार्थी रांगेने आपल्या वर्गात आनंदात जाताना दिसत होते. वर्गात शिरल्यानंतर बाकावर बसण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली. बाकावर बसल्यानंतर समोरच्या काळ्या फळ्याकडे पाहून व आपल्या शिक्षकाकडे पाहून विद्यार्थीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा आनंदात असल्याचे दिसून आले. हळूहळू जिल्ह्यातील सर्व पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत.

पालघर जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या जिल्हा परिषदेच्या एकूण १५८८ शाळा असून इतर व्यवस्थापनाच्या १११८ शाळा आहेत या दोन्ही आस्थापना मिळून जिल्ह्यातील या शाळांची संख्या दोन हजार ७०६ इतकी आहे. या शाळांमधून दोन लाख ६९ हजार ३११ विद्यार्थी संख्या आहे.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

दरम्यान डहाणू तालुक्यात बुधवारी ३७९, जव्हार तालुक्यात १०५, मोखाडा तालुक्यात १६०, पालघर तालुक्यात २६५, तलासरी तालुक्यात १६५, वसई तालुक्यात २०८, विक्रमगड तालुक्यात १७३ तर वाडा तालुक्यात १७७ पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत.

शाळांची सद्यस्थिती

पालघर जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या एकूण जि. प.शाळा: १५८८

खासगी व इतर आस्थापना एकूण शाळा : १११८

दोन्ही शाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या: २, ६९,३११

-सुरू झालेल्या शाळा: १६३२

शाळेत उपस्थित असलेले विद्यार्थी: ६४,६६२

शाळेत न आलेले मात्र

ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी : ३८,०३४

शाळेत अध्यापन देणारे उपस्थित शिक्षक: ४३९२

शिक्षकेतर कर्मचारी: ९१५

‘शाळेत येऊन मस्त वाटले’

शाळेत येऊन मस्त व छान वाटले,  मित्र भेटले. शाळेत येऊन शिकण्याचा व शिक्षकांशी संवाद साधण्याचा आनंद गगनात मावेनासा झाला अशी प्रतिक्रिया पालघरच्या जि. प. शाळेतील विद्यार्थिनी इयत्ता सहावीत शिकणारी नंदिनी कुशवाह हिने दिली. आनंद, उत्साह फक्त नंदिनीचाच नव्हता तर अनेक महिन्यानंतर शाळेत आल्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असताना दिसत होता.  पालघर जिल्ह्यात नववी बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले.