काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील निवेदन राज्यपालांना सादर केले.
एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून दुसरीकडे जनता दुष्काळात होरपळून निघत आहे. मात्र, तरीही शिंदे सरकारला यापरिस्थितीचं गांभीर्य नाही. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती बघता शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील निवेदन राज्यपालांना सादर केले. या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
“लोकसभा निडणुकीच्या काळात राज्यांत २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अद्यापही आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे अद्यापही देण्यात आली नाहीत. मात्र, शिंदे सरकार याकडे लक्ष्य द्यायला तयार नाही. त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
“दुष्काळ असताना सरकारचे मंत्री सुट्टीवर कसे”
“टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आलं. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकार मंत्री सुट्टीवर गेले. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या मंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी कोणाची परवानगी घेतली होती, याचा खुलासा झाला पाहिजे”, असे ते म्हणाले.
“जनावरांसाठी चारा छावण्या सोय करा”, पटोलेंची मागणी
“आज राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला आता आधाराची गरज आहे. तसेच राज्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. ही दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी”, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.
“राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा”
“छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. मात्र, या मोदी सरकारने संसद परिसरातून या महारपुरुषांची पुतळे काढले आहेत. त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून याबाबत राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा”, अशी मागणी केल्याचंही नाना पटोले यांनी सांगितले.