शिक्षक मिळावेत म्हणून आंदोलन

शिक्षक द्या, शिक्षक द्या.. शिक्षणाची भीक द्या.. शिक्षण आमच्या हक्काचं नाही..

नांदगाव उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची व्यथा

नांदगांव : शिक्षक द्या, शिक्षक द्या.. शिक्षणाची भीक द्या.. शिक्षण आमच्या हक्काचं नाही.. आमच्या शिक्षणाचा अधिकार आम्हाला द्या, आदी घोषणा देणाऱ्यांकडे सर्वाचेच लक्ष जात होते. कारण घोषणा देणारे एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, तर आपल्या शाळेला शिक्षक मिळावेत म्हणून आर्जव करणारे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील उर्दू शाळेचे विद्यार्थी होते. पंचायत समितीकडून आश्वासन मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बोलठाणच्या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केल्यावर त्याची एकच चर्चा झाली. बेशिस्त आणि गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या गैरकारभाराची खातेनिहाय चौकशी व्हावी, तीन शैक्षणिक सत्रापासून मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करणाऱ्या महिला शिक्षिकेवर कारवाई व्हावी, आदी मागणी या विद्यार्थ्यांनी केल्या. धक्कादायक बाब म्हणजे महिला शिक्षिकेची २०१९ पासून नियुक्ती असूनही एकदाही त्या शाळेत हजर झालेल्या नाहीत. या शिक्षिकेचा पती शाळेत येऊन हजेरी पटावर स्वाक्षरी करून जातो, अशी तक्रार शालेय समितीचे अध्यक्ष इंद्रिस सय्यद यांनी केली आहे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांनी या शिक्षिकेला शाळेतदेखील कधी बघितले नसल्याचे नाझमीन पठाण या विद्यार्थिनीने सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, अमोल नावंदर, सागर हिरे, मुजम्मील शेख, सुनील जाधव आदींनी आंदोलक विद्यार्थी आणि पंचायत समितीचे अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. बोलठाण येथील उर्दू शाळेला लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पंचायत समितीकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

पहिली ते आठवीच्या उर्दू शाळेच्या वर्गाना केवळ दोनच शिक्षक असून आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रत्येक वर्गाला किमान एक शिक्षक पाहिजे. आमच्या आठ वर्गाना दोनच शिक्षक असल्याने आमचे नुकसान होत आहे. आम्ही शिक्षण विभागाकडे शिक्षणाची भीक मागत आहोत. आम्हाला शिक्षक द्या.

– नाझमीन पठाण (विद्यार्थिनी)