शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन, शरद पवारांकडून श्रद्धांजली

गोखले शिक्षण संस्थेचे सचिव तथा महासंचालक, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

नाशिक – गोखले शिक्षण संस्थेचे सचिव तथा महासंचालक, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. डॉ. गोसावी यांच्या निधनाची माहिती मिळताच नाशिक दौऱ्यावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (९ जुलै) सकाळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली.

शरद पवार म्हणाले, “डॉ. गोसावी तसे मुळचे पैठणचे आहेत. असं असलं तरी त्यांनी नाशिक हे आपलं कार्यक्षेत्र मानलं. तसेच उभं आयुष्य इथं घालवलं. गोखले एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीतील महत्त्वाची संस्था आहे. त्याचं काम मुंबई, पालघर आणि नाशिकमध्ये आहे. दर्जेदार शिक्षण देण्यात त्यांचा लौकिक होता. ते गेले, परंतू त्यांचं स्मरण शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध क्षेत्रात अखंड राहील याचा मला विश्वास आहे.”

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी

सामाजिक विकासाचा व्यापक दृष्टीकोन ठेवून डॉ. गोसावी सर शिक्षण क्षेत्रात अहोरात्र कार्यरत राहिले. वाणिज्य, व्यवस्थापन याबरोबर वेदशास्त्र, साहित्य, कला, अध्यात्म, योगविद्या आदी विषयातही त्यांचा संचार होता. पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर संस्थेच्या भियक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. सर्वात तरुण वयात प्राचार्य होण्याचा मान त्यांना मिळाला.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

संस्थेचे संस्थापक प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या शब्दावरून ते सनदी सेवा क्षेत्र सोडून शिक्षणात आले आणि पुढील साडेसात दशके त्यांनी व्रतस्थपणे काम करून संस्थेला आधुनिक रुप दिले. पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम केले. जेडीसी बिटको संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उत्तर महाराष्ट्रात व्यवस्थापनशास्त्र शिक्षणाची पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली.

संस्थेच्या बोर्डी कोसबाड केंद्रात शेतीविषयक अभ्यासक्रम आणि नाशिकला एसएमआरके महाविद्यालयाच्या रुपाने महिलांना शिक्षणाचे स्वतंत्र दालन उपलब्ध करून देणे अशी पथदर्शक कामगिरी त्यांनी केली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. गोसावी यांच्या पश्चात कन्या प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे व शैलेश गोसावी आणि कल्पेश गोसावी हे दोन मुले आहेत.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

डॉ. गोसावी यांचे पार्थिव संस्थेच्या भियक्ष महाविद्यालयाच्या प्रांगणात अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून सायंकाळी साडेपाच वाजता अंतीम संस्कार होतील , अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.