शिवजयंतीत करोना नियमांकडे दुर्लक्ष नको!

करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन पुन्हा करोना वाढणार नाही यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

पालकमंत्र्यांची सूचना

नाशिक: करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन पुन्हा करोना वाढणार नाही यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शिवजयंती साजरी करताना करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शहरातील शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पालकमंत्र्यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवजयंती हा सर्वाचा उत्सव असून हा उत्सव साजरा करताना समाजात आनंद कसा वाढेल यावर भर द्यावा, असे भुजबळ यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात यावे. शिवजयंती उत्सव साजरा करतांना करोनाच्या नियमांचे काटेकोर पालन, प्रशासन आणि यंत्रणेला सहकार्य करावे. उत्साहाच्या भरात उत्सवाला कुठलेही गालबोट लागता कामा नये. हा उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडेल यासाठी सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवजन्मोत्सव समित्यांच्या विविध अडचणी मांडल्या गेल्या. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे निरसन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मामा राजवाडे, अंबादास खैरे, संदीप लभडे, नितीन रोठे, राम पाटील आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

ध्वज, पताका लावताना काळजी घेण्याचे महावितरणचे आवाहन

शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, फेरी, देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमस्थळी आणि सर्वत्र पताका, ध्वज उभारले जातात. रोषणाई केली जाते. मात्र हे काम करताना विद्युत खांब किंवा वाहिन्या याच्या संपर्कात ध्वज, पताका येणार नाही, याची दक्षता घ्यावी. शिवजयंती साजरी करताना वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर, सावधगिरी बाळगावी, विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

शहरासह गावांमध्ये महावितरणच्या उच्च व लघु दाबाच्या विद्युत वाहिन्या, वीजखांब उभारलेले आहेत. अशा ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या खाली किंवा विद्युत यंत्रणेजवळ कार्यक्रम, फेरी, देखावे, छायाचित्रे वा मूर्ती उभारू नये. संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येणार आहे, तेथे महावितरणकडून तात्पुरती अधिकृत वीज जोडणी घ्यावी. विद्युत वाहिनीच्या उंचीनुसार सुरक्षित अंतरावर फलक, ध्वज लावावे, जेणेकरून विद्युत वहिनीला वा यंत्रणेला स्पर्श होणार नाही. रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावी. रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यांच्या माळा खाली झुकलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या नाहीत, याची खातरजमा करावी. जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या टेपचा वापर करावा. उत्सव काळात शॉर्ट सर्कीट होणे, विद्युत वायिरगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तातडीच्या मदतीची गरज भासल्यास ९१२ अथवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे महावितरणने म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन