“शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

Shivsena Demands Home Ministry : संजय शिरसाट म्हणाले होते, “शिवसेनेला (शिंदे) गृहमंत्रीपद मिळायला हवं”.


Shivsena Demands Home Ministry Sanjay Shirsat Statement : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित होऊन आठवडा उलटला. तरी मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? याचं गणित सुटलेलं नाही. तसेच महायुतीने सत्तास्थापन केलेली नाही. अशातच भाजपाने आमचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट केलं असून एकनाथ शिंदे व अजित पवारांनी शर्यतीतून माघार घेतली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुती सरकारमध्ये जास्तीत जास्त मंत्रिपदं व गृहमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिंदेंचे निकवर्तीय, छत्रपती संभाजीनगरचे आमदार व पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, “आधीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे गृहमंत्रीपद देखील होतं. आता भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असणार आहे व शिवसेनेकडे (शिंदे) नैसर्गिकरित्या उपमुख्यमंत्रीपद येणार असेल तर त्याबरोबर गृहमंत्रीपदही मिळायला हवं”. शिरसाटांच्या या वक्तव्यावर आता भारतीय जनता पार्टीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचले का?  Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश अन् उमेदवाऱ्याही जाहीर; ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना अप्रत्यक्ष इशारा?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “कुठल्याही सरकार स्थापनेच्या चर्चा या प्रसारमाध्यमांच्या बातम्यांद्वारे होत नाहीत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर एखादं वक्तव्य करून अशा प्रकारच्या चर्चा होत नाहीत. जे काही निर्णय असतील ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तीन प्रमुख नेते घेतील. हे तिघे एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. त्यानंतर भाजपाचं केंद्रीय नेतृत्व त्या निर्णयाला मान्यता देईल. ही खूप सोपी गोष्ट आहे. मी प्रसारमाध्यमांसमोर काहीतरी बोललो किंवा इतर कोणी काहीतरी बोललं या चर्चेतून किंवा प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमधून सरकार स्थापनेच्या चर्चा होत नाहीत. सरकार स्थापन होत नाही.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?

संजय शिरसाट यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंची भूमिका स्पष्ट आहे, असा खुलासा केला. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना वाटतं की आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे, तेव्हा ते दरेगावला जात असतात. ते त्यांच्या आवडीचं ठिकाण असल्यामुळे ते तिथे जातात. परंतु, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं आहे की मी सरकार स्थापनेत कोणताही अडसर आणणार नाही. भाजपाचे वरीष्ठ जो निर्णय घेतील त्याला माझा पक्ष बांधील राहील. दिल्लीच्या बैठकीतही त्यांनी हेच सांगितलं. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घ्यावा, तो आम्हाला तो मान्य असेल”. दरम्यान, मुख्यमंत्री व गृहमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे महायुतीवर व भाजपावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा शिरसाट यांनी फेटालून लावल्या आहेत.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल