आंदोलनात रावसाहेब कसबे यांची टीका
आंदोलनात रावसाहेब कसबे यांची टीका
नाशिक : शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास बदनाम करणे हे केंद्रातील सत्ताधारी भाजपला शोभणारे नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास देशात अराजकता निर्माण होईल, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिला.
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या आवाहनानुसार तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तसेच आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवाजी महाराज पुतळा येथे दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.
संविधान वाचवा जन आंदोलन समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कसबे यांच्यासह साहित्यिक उत्तम कांबळे तसेच इतर अनेक जण उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कसबे यांनी शेतकरी आंदोलन हाताळणीवरून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या मंडळींकडून शेतकरी आंदोलनास खालिस्तानवादी, आंदोलनामागे पाकिस्तान, चीनचा हात असल्याचे सांगितले जाते. शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आंदोलन दडपण्याचा भाजपचा
प्रयत्न आहे. मुळात सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याकडे कसबे यांनी लक्ष वेधले.
कडाक्याच्या थंडीत शेतकरी दिल्लीच्या सभोवताली महामार्गावर ठिय्या मांडून बसले आहेत. केंद्र सरकार हे आंदोलन रखडवत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जन आंदोलन पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साहित्यिकांसह डॉ. डी. एल. कराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राजू देसले, डॉ. शोभा बच्छाव, सुनील मालुसरे आदी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच दिल्लीतील आंदोलनात जिल्ह्यातून शेकडो शेतकरी सहभागी होण्यासाठी कूच करणार असल्याचे देसले यांनी सांगितले. आंदोलनात किसान सभा, माकप, काँग्रेस, भाकप, आप, वंचित आघाडी, आरपीआय (कवाडे गट), छात्रभारती, आयटक, जनवादी महिला संघटना आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले.