शोभेसाठी तलवार खरेदीकडे कल

शोभेसाठी अनेक जण तलवार खरेदीच्या मोहात पडले तर कोणी दहशत पसरविण्यासाठी त्या खरेदी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मालेगाव, धुळ्यात सापडलेल्या तलवारींचा राजस्थानशी संबंध

नाशिक : मागील चार महिन्यांत नाशिक परिक्षेत्रात ४४ गावठी बंदुका, ७४ काडतुसे, १२१ तलवारी असा सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी ४६ गुन्हे दाखल करून १३० संशयितांना अटक केली आहे. यामध्ये सर्वाधिक ७५ तलवारी नाशिक ग्रामीणमध्ये तर २९ धुळे जिल्ह्यातील आहेत. राजस्थानमधून त्या स्थानिक पातळीवर विक्रीसाठी येत आहेत. शोभेसाठी अनेक जण तलवार खरेदीच्या मोहात पडले तर कोणी दहशत पसरविण्यासाठी त्या खरेदी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. मालेगाव, धुळे येथील कारवाईत पोलिसांनी मोठ्या संख्येने तलवारी जप्त केल्या. बहुतांश तलवारींना धार नव्हती. म्हणजे राजस्थानमधून धार नसलेल्या तलवारी येतात. स्थानिक पातळीवर धार लावून त्यांची विक्री केली जाते. तलवारींची खरेदी गुन्हेगारांच्या टोळक्यांकडून वा एखाद्या गटाकडून झालेली नाही. अनेक जण दिखाऊपणासाठी त्या खरेदी करतात. काहींची खरेदी दहशत पसरवण्यासाठी झालेली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन तपास केल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगितले. अवैध शस्त्रास्त्र प्रकरणातील संशयितांवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार आहे. शेतकरी फसवणुकीबाबत परिक्षेत्रात ११९२ तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या. यामध्ये फसवणूक झालेली रक्कम ४६ कोटी २० लाख रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणी १९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून २०० प्रकरणांत आपआपसात तडजोड झाली. १९९ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पावणेसहा कोटींहून अधिकची रक्कम परत केली आहे. याशिवाय पाच कोटी ८४ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम व्यापारी शेतकऱ्यांना परत करण्यास तयार झाले आहेत. या माध्यमातून १२ कोटी ६० लाखांहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुशिक्षित बेरोजगारांच्या फसवणुकीबाबत परिक्षेत्रात ३९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त अर्जात फसवणुकीची रक्कम दोन कोटी ३८ लाखांहून अधिक आहे. या प्रकरणी ३० गुन्हे दाखल करण्यात आले. दोन प्रकरणांत आपसात तडजोड झाली. सुशिक्षित बेरोजगारांना आतापर्यंत ३७ लाख ३८ हजारांची रक्कम परत मिळाली, तर १५ लाख ५७ हजारांची रक्कम बेरोजगारांना परत करण्यास संशयित व्यक्ती तयार आहेत.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

गुटखा प्रकरणातील संशयितांवर तडिपारी

चार महिन्यांत परिक्षेत्रात गुटख्याची अवैध वाहतूक, विक्री प्रकरणी ६२ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी ८३ संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत नऊ वाहनांसह तीन कोटी ४८ लाखांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांवर तडिपारीची कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगितले.

धुळे-मध्य प्रदेशच्या सीमेवर गांजा शेती

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

मध्य प्रदेश आणि धुळे (महाराष्ट्र)सीमेवर गांजाची शेती केली जात असल्याचे पोलीस कारवाईत उघड झाले आहे. परिक्षेत्रात चार महिन्यांत ३३ जणांविरुद्ध २३ गुन्हे दाखल करण्यात आले. त्या अंतर्गत ५२० किलोहून अधिक गांजा, २७१ गांजाची झाडे, ओलसर पाने आणि मोटारसायकल असा ६८ लाखांहून अधिकचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये एकट्या धुळे जिल्ह्यातील ४५ लाखांहून अधिकच्या मालाचा समावेश आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल