संकेतस्थळावर लसीकरणासाठीची वेळ मिळत नसल्याने गैरसोय

संकेतस्थळावर लसीकरणासाठीची वेळ मिळत नसल्याने गैरसोय

केंद्रावर थेट जऊनही निराशा, शारीरिक अंतर नियमांचा फज्जा 

नाशिक :  मे महिन्यापासून देशभरात १८ ते ४४ वयोगटासाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी तयार केलेल्या को-विन संकेतस्थळावर पूर्वनोंदणी आणि भेटीची वेळ घेणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील दोनच रुग्णालयात या वयोगटासाठी लस उपलब्ध असताना नागरिकांना वेळ मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

कोविन संकेतस्थळावर लॉगीन केल्यानंतर पिनकोड किंवा राज्य तसेच जिल्ह्याची माहिती भरून लसीकरण केंद्र तपासावे लागते. नागरिकांच्या सोयीचे केंद्र निवडतांना सर्वच केंद्रांवर आठवडय़ाभरासाठी नोंदणी असे दाखविण्यात येते. यामुळे संबंधित वयोगटास लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसते. चार दिवसांपासून लसीकरणासाठी कोणतीही वेळ निश्चित के ली तरी हेच चित्र पाहायला मिळत आहे. वेळ मिळत नसल्यामुळे अनेक नागरिक थेट लस उपलब्ध असलेल्या केंद्रावर जाऊन चौकशी करू लागले आहेत. परिणामी, सामाजिक अंतर नियमांचा फज्जा उडत आहे. लसीकरण केंद्रावर गेल्यावर तेथील सुरक्षारक्षकांना जीवाची बाजी लावून गर्दी थोपविण्याचे काम करावे लागते. त्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची भीती आहेच.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

कोविन संकेतस्थळावर लसीकरणासाठी वेळ मिळत नाही. तसेच केंद्रावरही निराशाच पदरी पडत असल्याने १८ ते ४४ वयोगट प्रशासनाच्या कारभाराला वैतागला आहे. लसीकरणासाठी मात्रा कधी उपलब्ध होतील, नागरिकांनी कोणत्या वेळी यावे, याबद्दल कोविन संके तस्थळावर निश्चित वेळेचे नियोजन देण्यात आलेले नाही.

संकेतस्थळावर दिवसभरात कुठल्याही वेळेत मात्रांची उपलब्धता दाखविण्यात येते. ज्यांना वेळ मिळते तेच नशीबवान ठरतात. लशीच्या मात्रांचा तुटवडा ही सार्वत्रिक समस्या आहे. त्यामुळे केंद्रांवर निव्वळ १०० मात्रा उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. काही नागरिक लसीकरणाची वेळ मिळाल्यावर करोनाबाधित होतात. त्यांना मात्रा दिली जाऊ शकत नाही. परंतु, त्यांना निश्चित के लेली मात्रा इतर कुणासाठीही उपलब्ध होते किंवा नाही, याबद्दल माहिती मिळालेली नाही.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

समाज माध्यमात रोजच तक्रारींचा पाऊस पडत आहे. त्यावर प्रतिसाद देत नागरिकांना आश्वस्त करण्याचे कष्टही लोकप्रतिनिधी किं वा प्रशासनाकडून घेतले जात नाही. लसीकरण मोहीम मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली.

टाळेबंदीच्या काळात घरी बसलेली जनता किमान लसीकरण करून घेऊन सुरक्षित रहावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. मोहिमेत प्रशासनाचे नियोजन कमी पडत असल्याचे आणि अभियानातच कमकुवतपणा आला असल्याने नागरिकांची निराशा होत आहे.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा