संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक; म्हणाले, “आता जे मुख्यमंत्री झालेत ते…”

“माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय.”

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिल्याची राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरुन भाष्य केलेलं असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना आधी शाब्दिक चिमटा काढला आणि नंतर फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

मुंबईमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांना, “देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीवर काय सांगाल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “यावर मी कसं काय बोलणार? भाजपाने निर्णय घेतलाय त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा. मला अजून फडणवीसांबद्दल बोलताना तोंडामध्ये उपमुख्यमंत्री हा शब्द येत नाही. एक तर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय. देवेंद्रजींच्या बाबतीत असं काही झालं किंवा होत असेल तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं राऊत म्हणाले.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देणं हा पंख छाटण्याचा प्रयत्न वाटतो का?, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मी असं नाही म्हणणार. शेवटी कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत बसलेत. नवीन सरकार स्थापन होतंय. विधीमंडळ पक्षाची बैठक होतेय आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद स्वीकारा असा आदेश दिला जातो. आता जे मुख्यमंत्री झालेत ते त्यांच्याच मंत्रीमंडळामध्ये ज्युनियर मंत्री होते. भाजपामध्ये शिस्त आणि आदेश याचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्याचं कौतुक केलं पाहिजे,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

यावेळेस बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदेंना पदावरुन काढल्यासंदर्भातही भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंना पदावरुन काढलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल?”, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत यांनी, “त्यात काय सांगायचं. शिस्तभंगाची कारवाई आहे, ती पक्ष प्रमुखांच्या स्वाक्षरीने झालेली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये नेते म्हणून त्यांची नेमणूक उद्धव ठाकरे यांनीच केली होती. माझी नेमणूक बाळासाहेब ठाकरेंनी केली होती फार पूर्वी. नंतरच्या कार्यकरिणीमध्ये काही नेत्यांच्या नेमणूका उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुखांच्या अधिकारात ज्या गोष्टी आहेत त्यानुसार केल्या. आणि त्याच अधिकारामध्ये त्यांनी काही नेत्यांना दूर केलं असेल,” असं उत्तर दिलं.