एनडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरीही सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येतील. एनडीए आहे कुठे? असं संजय राऊत यांनी म्हटलंंय.
देशात फक्त राजकीय विरोधकांच्याच मालमत्तांच्या मागे ईडी लावली जाते आहे. जो न्याय प्रफुल्ल पटेलांना लावला तोच सगळ्यांना लावला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसंच मोदी म्हणजे बडा राजन आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे छोटा राजन असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदींना सरकार चालवताना नाकी नऊ येतील
संजय राऊत यांनी एनडीच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर भाष्य केलं. “एनडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरीही सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येतील. एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का? हे दोघं तर सगळ्यांचेच आहेत. आज ते तुमच्याकडे आहेत, उद्या आमच्याकडे येतील. अग्निवीर योजनेला सरकार स्थापनेच्या आधीच विरोध झालाय. इतर योजनांनाही विरोध दर्शवतील. उद्या राम मंदिरालाही ते विरोध करु शकतात. चंद्रबाबू मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने आहेत. आता मोदी काय करतील? अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा सुरु आहे. त्यांना सरकार बनवायचं आहे बनवू द्या. पण मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही. मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून भाजपाला बहुमतमुक्त केलं आहे. तरीही त्यांना सरकार बनवायचं आहे, तसा दावा ते करत आहेत ही लोकशाहीची थट्टा आहे.”
एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
“शिंदे गटाचे खासदार चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांना परदेशात चार हाय कमिश्नरची पदंही देणार आहेत. त्यांनी मागितलेत असं कळलंय. अजून काय काय मागणार आहेत माहीत नाही. चोऱ्यामाऱ्या करुन निवडून आलेत. चोरलेला पक्ष, चोरलेले विजय अमोल किर्तीकरांसारखे. त्यामुळे काही दिवसांनी हाय कमिश्नर म्हणून निवडलेले दिसतील असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
पराभवाची मीमांसा होईलच
“देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील तर तो त्यांचा निर्णय. त्यांच्या पक्षाचं हायकमांड दिल्लीत आहे. महाराष्ट्रात पराभव झालाय तर तिथे बोलवलं गेलं. आमचा पराभव जिथे झाला त्याची मीमांसा आम्ही करणार आहोत. तसं भाजपालाही करावंच लागेल. महाराष्ट्रात काय करायला गेलो आणि काय झालं? यावर चिंतन होईल. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे.” असं संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी बडा राजन आणि देवेंद्र फडणवीस छोटा राजन
“काँग्रेसने खोटं काहीही सांगितलं नाही. खोटं बोलणारे नरेंद्र मोदी आहेत. खोट्यांचे सरदार मोदी आहेत. देवेंद्र फडणवीस छोटे सरदार आहेत. एक बडा राजन आणि दुसरा छोटा राजन. खोटं बोलण्यास सुरुवात कुणी केली तर मोदी आणि शाह यांनी केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही गोष्टी शिकवायला जाऊ नये.” असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे.