संभाजीनगरवासीय आनंदले, नाशिककर दु:खी… जायकवाडीसाठी विसर्गाला सुरुवात

पाणी चोरी होऊ नये म्हणून नदी काठावरील भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाईल. धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिक : राजकीय पातळीवरून दबाव वाढल्याने गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या आदेशाची अखेर अंमलबजावणी झाली असून शुक्रवारी रात्रीच दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. सुरळीत विसर्ग व्हावा म्हणून गोदावरीतील बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याचे काम शनिवारी युध्दपातळीवर करण्यात येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी काठावरील भागात वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

दुष्काळी वर्षात पाण्यावरून नाशिक, नगर आणि मराठवाड्यात संघर्ष सुरू होता. समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यास तीव्र विरोध झाल्यामुळे या आदेशाची चार आठवडे अंमलबजावणी झाली नाही. याच काळात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने महामंडळाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे नाशिक व नगरमधून पाणी सोडण्याबाबत राजकीय दबाव वाढू लागला.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

त्या संदर्भात आदेश प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन पाणी सोडण्याची तयारी केली. शुक्रवारी रात्री दारणा धरणातून २०० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गोदावरी पात्रातील बंधाऱ्यांचे फळ्या काढल्यानंतर विसर्गाचे प्रमाण वाढविले जाईल. दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडायचे आहे. गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास काही अवधी लागणार आहे. तीन, चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.

गंगापूर ऐवजी दारणाचा पर्याय

गंगापूर धरणातील पाणी हे ७० टक्के पिण्यासाठी आरक्षित आहे. उर्वरित पाणी द्राक्ष बागांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिले जाते. या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना तिसरे आवर्तन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होणार असल्याने पाणी सोडण्याच्या आदेशातून नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला वगळावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी सरकारकडे केली आहे. दारणा धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी उचलता येत नाही. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडण्याऐवजी ५०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी दारणा धरणातून सोडावे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव

यंत्रणेची तयारी काय ?

यापूर्वी विसर्ग करताना थेट एकदा शेतकऱ्यांनी धरणावर धडक देऊन विसर्ग थांबवला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. गोदावरी नदीवर खालील भागातील बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. पाणी चोरी होऊ नये म्हणून नदी काठावरील भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाईल. धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या काळात नदीपात्रात बसविलेल्या मोटारी व व इतर साहित्य काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्गावेळी नदीपात्रात कुणी उतरू नये, पाळीव जनावरांना जाऊ देऊ नये. विसर्गात अडथळा निर्माण होणार नाही याची नदीकाठच्या रहिवाश्यांनी दक्षता घ्यावी. प्रवाहामुळे काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी