
अदानी समूहाचे लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार तसेच मणिपूरमधील हिंसाचार अशा अनेक मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक झाले.
नवी दिल्ली : अदानी समूहाचे लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार तसेच मणिपूरमधील हिंसाचार अशा अनेक मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक झाले. विरोधकांच्या गोंधळात दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी लोकसभेचे कामकाज जेमतेम १५ मिनिटे झाले. सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी विशेषत: समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी जबरदस्त घोषणाबाजी केली. संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून हे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या आसनासमोर गोंधळ घालू लागल्याने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह तहकूब केले. विरोधकांच्या गोंधळात अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा प्रयत्न केला. भाजपचे खासदार अरुण गोविल यांनी विचारलेल्या प्रश्नानंतर पाच मिनिटांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनीही विरोधकांना शांततेचे आवाहन केले पण, गोंधळ न थांबल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तबकूब झाले.
राज्यसभेतही अदानी प्रकरणावरून काँग्रेसच्या सदस्यांनी नियम २६८ अंतर्गत नोटीस दिली होती. मात्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी १८ नोटिसा फेटाळल्या. अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची परवानगी धनखड यांनी नाकारल्याने काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. त्यांच्या घोषणाबाजीत सभागृह आधी साडेअकरापर्यंत आणि नंतर दिवसभर तहकूब करण्यात आले.