“सकाळी पेपरमधील बातम्या वाचल्यावर अर्थमंत्र्यांना व्याजकपातीसंदर्भात समजलं असावं”

लहान बचत योजनांवरील व्याजकपातीच्या निर्णयावरुन मोदी सरकारचा यू-टर्न

लहान बचत योजनांवरील व्याजकपातीच्या निर्णयावरुन मोदी सरकारने यू-टर्न घेतला आहे. अर्थमंत्रालयाने व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा गुरुवारी सकाळी गेली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतल्यानंतर केंद्रावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. त्यामुळेच आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्याजकपातीचा निर्णय चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र निर्मला यांनी ट्विटरवरुन दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी आणि शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरुन निर्मला यांनी चुकून निर्णय निघाल्याच्या स्पष्टीकरणावरुन टीका केलीय.

प्रियंका गांधी म्हणतात…

निवडणुक प्रचारामध्ये व्यस्त असणाऱ्या प्रियंका यांनी निर्मला यांचे ट्विट रिट्विट करत त्यावर प्रतिक्रिया दिलीय. प्रियंका यांनी खरोखरच तुमच्याकडून चूक झाली की काय असा टोला लगावला आहे. “खरंच निर्मला सीतारामन तुमच्याकडून सरकारी योजनांवरील व्याजकपात करण्यासंदर्भातील निर्णय चुकून प्रसिद्ध झाला की निवडणुका लक्षात घेता तुम्ही हा निर्णय मागे घेत आहात?”, असा प्रश्न विचारला आहे.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

सकाळी वृत्तपत्र वाचलं अन्…

दुसरीकडे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही खोचक शब्दात निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे. सकाळी पेपरमधील बातम्या वाचल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना व्याजकपातीसंदर्भात समजलं असावं, असं चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  “(व्याजकपात करण्याचा) निर्णय रद्द करण्यात आला. असं वाटतंय की सकाळी महत्वाची वृत्तपत्रं वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याजकपात झाल्यासंदर्भातील माहिती मिळाली. खरं हे आहे की, सध्याच्या सरकारची धोरणं ही चुकून घेतलेल्या निर्णयासारखी असल्यानेच अर्थव्यवस्थेची पडझड होत आहे,” असं ट्विट चतुर्वेदी यांनी म्हटलंय.

निर्मला सीतारमन यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे –
“केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांवरील व्याजदर २०२०-२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत होते तेच राहतील, म्हणजेच मार्च २०२१ पर्यंतचे दर. चुकून प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात येईल,” असं स्पष्टीकरण निर्मला सीतारमन यांनी ट्विटरवरुन दिलं आहे.

मात्र निर्मला सीतारमन यांनी हा निर्णय मागे देताना दिलेलं कारण अनेकांना खटकं आहे. हा आदेश निवडणुकामुळे मागे घेतला आहे की एप्रिल फूल करत आङात असं अनेकांनी थेट निर्माला यांच्या ट्विटरवर रिप्लाय देताना विचारलं आहे. ट्विटरवरुन अनेकांनी यासंदर्भात थेट नाराजी व्यक्त केली आहे. एवढा महत्वाचा आदेश चूकून कसा निघाला?, निवडणुकांमुळे मागे घेतला की एप्रिल फूल करताय?, अशापद्धतीने चुकून एवढा मोठा निर्णय कसा काय जाहीर करण्यात आला?, संबंधितांवर कारवाई करणार का?, भारतीयांबरोबर एप्रिल फूल्स डे प्रँक केलाय का?, ही गंभीर चूक वाटत नाही का? हे आणि असे अनेक प्रश्नांचा नेटकऱ्यांनी पाऊस पाडलाय. अनेकांनी यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करत हे बेजबाबदारपणाचं वागणं असल्याचं म्हटलं आहे.