सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड या रस्त्यावर मोठे खड्डे झाले असून चालकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड या रस्त्यावर मोठे खड्डे झाले असून चालकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

वणीपासून सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांच्या स्वागतासाठी मोठे खड्डे पडले आहेत. अंदाजे एक फुटाचे खड्डे झाले असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचले असून या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळून तीन ते चार अपघात झाले आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्डा किती खोल, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे चारचाकी वाहनेही या खड्ड्यात आदळत असून वाहनांचे नुकसान होत आहे. या रस्त्याला उतार असल्यामुळे तसेच परिसरात कायम धुके राहत असल्याने वाहन चालविणे कठीण होत आहे. एक खड्डा टाळायचा असेल तर दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाते. त्यामुळे कोणत्यातरी खड्ड्यात वाहन जातेच. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत नसल्याने अपघातांमध्येही वाढ झाली आहे.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

याठिकाणी दोन ते तीन महिन्यापूर्वी रस्त्यावर खडी आणि कच टाकून थातूरमातूर दुरुस्तीचे नाटक करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुरुस्तीकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वारंवार गडावर येत असतात. या रस्त्यानेच त्यांचे येणे- जाणे असते. तरीही रस्त्याच्या अवस्थेकडे त्यांच्याकडून लक्ष देण्यात येत नसल्याबद्दल भाविकांनी संताप व्यक्त केला

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्डे ही नेहमीची डोकेदुखी झाली आहे. पावसाळ्यात हा त्रास जास्त सहन करावा लागतो. मोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नसल्याने व पाणी साचल्याने अपघात होत आहेत. आठ दिवसात हे खड्डे न बुजविल्यास यामध्ये वृक्षारोपण करणार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार -योगेश कदम (सामाजिक कार्यकर्ता, सप्तशृंगी गड)

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले