सभागृहनेते सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड

कारवाईसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

नाशिक : भाजपचे मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे आणि शिवसेना कार्यकर्ता सागर देशमुख यांच्यात धुमसत असलेल्या वादाला बुधवारी वेगळेच वळण मिळाले. दुपारी १२ वाजता टोळक्याने राजीवनगर टाऊनशिप भागातील सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढविला. दगड, लाठय़ा-काठय़ांनी कार्यालयासह पालिकेच्या वाहनाची तोडफोड केली. दोन दिवसांपूर्वी सोनवणे यांनी सेना कार्यकर्त्यांच्या फलकास लाथाडल्याची चित्रफीत समाजमाध्यमात फिरत होती. तोडफोडीच्या घटनेनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. अंतर्गत वादातून ही घटना घडली असून त्याच्याशी पक्षाचा कुठलाही संबंध नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यातून राजकीय संघर्ष उफाळून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान मिळत आहे. सोनवणे-देशमुख गटात काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. त्याचे पर्यावसान कार्यालयावरील हल्ल्यात झाल्याचे सांगितले जाते. दोन मे रोजी सागर देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी सोनवणे यांच्या कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना धमकावले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नंतर याच परिसरातील एका चौकात सेना कार्यकर्त्यांने लावलेल्या फलकास खुद्द सोनवणे लाथा मारत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमात फिरली. या घटनाक्रमानंतर १० ते १२ युवकांचा गट सोनवणे यांच्या कार्यालयावर दुपारी चालून आला. दगडफेक करीत लाठय़ा-काठय़ांनी कार्यालयाची मोडतोड केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या पालिकेच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. अकस्मात झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. कार्यालयातील काही साहित्य संशयितांनी रस्त्यावर फेकले. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

करोनाच्या निर्बंधात संचारबंदी आणि पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास प्रतिबंध असताना १० ते १२ जणांचे टोळके खुलेआम येते, रस्त्यावरून दगडफेक करते, कार्यालयासह वाहनाची तोडफोड करीत असल्याचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना समजल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी, भाजपच्या  पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

संशयितांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यावेळी सुरक्षित अंतराच्या पथ्याचा सर्वाना विसर पडला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयितांना अटक करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर भाजपचे पदाधिकारी माघारी फिरले.

भाजपचे सतीश सोनवणे आणि शिवसेना कार्यकर्ता सागर देशमुख यांच्यात मागील चार-पाच दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. उभयतांनी परस्परांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या वादाशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. तो राजकीय वाद देखील नाही. एकाने फलकांना लाथा मारल्याच्या चित्रफिती आहेत. दुसऱ्याने कार्यालयात धुडगूस घातल्याची तक्रार आहे. हा त्यांचा अंतर्गत वाद आहे.

– सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुखशिवसेना)

शिवसेनेशी संबंधित सागर देशमुखसह १२ जणांच्या टोळक्याने आपल्या कार्यालयावर हल्ला केला. महापालिकेच्या गाडीचे नुकसान केले. यापूर्वी दोन तारखेला संशयिताने कार्यालयात येऊन धमकावले होते. गुन्हेगारी प्रवृत्तीची ही व्यक्ती असून पूर्वी त्याला तडीपार करण्यात येणार होते. राजकीय वरदहस्ताने ती कार्यवाही थांबली. मद्यपान करून संशयित दररोज शिवीगाळ करीत होता. तक्रार देऊनही त्याच्याविरुध्द कारवाई झाली नाही. त्यामुळे चौकात त्याला विचारणा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा फलकावर राग निघाला. टोळक्याने घातलेला धुडगूस, कार्यालयावर के लेला हल्ला यामुळे प्रभागात दहशत पसरली आहे.

– सतीश सोनवणे (सभागृह नेताभाजपमहापालिका)