सरकार बनवण्यासाठी पुरेसे संख्याबळ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा, विरोधी पक्षाचा निर्णय जनतेकडे

नवी दिल्लीतील अमित शहा यांच्या निवासस्थानी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : ‘‘सरकार बनवण्यासाठी आम्ही सुस्थितीत आहोत आणि आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. लोकशाहीमध्ये मजबूत विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे आणि विरोधी पक्ष कोणाला करायचे याचा निर्णय जनताच घेणार आहे,’’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील अमित शहा यांच्या निवासस्थानी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील वाढत्या कटुतेवर विचारले असता शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोष दिला. देशातील राजकीय दर्जाच्या घसरणीसाठी त्यांना जबाबदार धरले. ‘‘राहुल गांधींच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसची वागणूक बदलली आहे. त्यानंतर राजकारणाचा दर्जा घसरला आहे. ज्या पक्षांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली, त्यांच्या वृत्तीवरही याचा परिणाम झाला आहे,’’ असे शहा म्हणाले.

सहाव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ‘आम्ही ३०० ते ३१० च्या दरम्यान आहोत. आता अखेरचा टप्पा असून आम्ही सुस्थितीत आहोत, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

नरेंद्र मोदींकडेच नेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होण्याची शक्यता अमित शहा यांनी नाकारली. केवळ जूनमध्येच मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असे नाही तर २०२९ मध्येही पंतप्रधान आमचे नेतृत्व करतील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ‘भाजपमध्ये वयोमान ७५ झाल्यानंतर नेते निवृत्त होतात,’ हा विरोधी पक्षांचा दावा त्यांनी खोडून काढला. ‘पक्षाच्या घटनेत कोणताही नियम किंवा तरतूद नाही. काही निर्णय विशिष्ट परिस्थितीत घेतले गेले. जेव्हा ती परिस्थिती नसते तेव्हा हे नियमही नसतात,’ असे अमित शहा म्हणाले.

तुष्टीकरणावर विश्वास नाही

स्वत:ला व्यापक बनवलेल्या आणि आता तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे लक्ष्य असलेल्या भाजपमध्ये एकही मुस्लीम खासदार नाही याबाबत विचारले असता, शहा म्हणाले, ‘‘माझा तुष्टीकरणावर विश्वास नाही. आमची कोणतीही योजना धर्मावर आधारित नाही, आम्ही कोणाशीही भेदभाव केलेला नाही.’’

शरद पवार यांच्यावर टीका

२०१९ मध्ये मागे जाता आले तर महाराष्ट्रामध्ये वेगळे काय कराल का, असे विचारले असता शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. २०१९ च्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा आम्हाला बहुमत मिळाले. शरद पवार आमचे मित्र उद्धवजींना घेऊन गेले. ते आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. ज्यांनी हे राजकारण सुरू केले, त्यांना ते संपवावे लागेल, असे शहा म्हणाले. या वर्षअखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, उद्धव ठाकरे यांना रालोआमध्ये परत स्वीकारले जाईल का, असे विचारले असता ते म्हणाले, आमची युती आहे आणि ती चांगली चालली आहे.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

पराभवाला राहुल-प्रियंका यांना जबाबदार धरले जाणार नाही शहा

कुशीनगर (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपले पद गमवावे लागेल. मात्र पराभवासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वधेरा यांना जबाबदार धरले जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सांगितले. उत्तर प्रदेशातील बलिया आणि चंदौली या ठिकाणी गृहमंत्र्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींचे समर्थक नेते पत्रकार परिषदा घेतील आणि ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला, असे सांगतील. माझ्याकडे पहिल्या पाच टप्प्यांचा तपशील आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांत पंतप्रधान मोदींनी ३१० जागांचा टप्पा ओलांडला आहे. राहुल ४० पार करणार नाहीत आणि अखिलेश यादव यांना ४ जूनला चार जागाही मिळणार नाहीत, असे अमित शहा म्हणाले.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?