गेल्या १७ वर्षांपासून ही संस्था जंगले आणि देवराया वाचवण्यासाठी आणि त्यासाठी धनेश पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काम करत आहे. या कामासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामधील जंगले वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प संस्था’ काम करत आहे. ही मोहीम हाती घेतल्यानंतर जंगलांच्या संवर्धनासाठी धनेश पक्ष्यांचा मोठा हातभार लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या पक्ष्यांच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या १७ वर्षांपासून ही संस्था जंगले आणि देवराया वाचवण्यासाठी आणि त्यासाठी धनेश पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काम करत आहे. या कामासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
कोकणात आढळणाऱ्या धनेश पक्ष्याच्या चार प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ‘सह्याद्री संकल्प’ने त्याची कारणे शोधून त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करून धनेश पक्ष्याच्या कृत्रिम ढोल्या बनवण्यास सुरुवात केली गेली. या पक्ष्याला ‘जंगलाचा शेतकरीह्ण म्हणून ओळखले जाते. त्याच्या विष्ठेमधून मिळणाऱ्या फळांच्या बिया गोळा करून त्यातून रोपे तयार केली जात आहेत. यासाठी रोपवाटिका (नर्सरी) उभारण्यात आली आहे. मात्र अपुऱ्या आर्थिक साहाय्यामुळे संस्थेच्या कामाला मर्यादा येत आहेत. भावी पिढीचा विचार करून या संस्थेने
धनेश पक्ष्याच्या प्रजाती वाढविणे, त्या टिकविणे तसेच जंगलाचे संवर्धन करणे हे काम हाती घेतले आहे. यासाठी विस्तारित रोपवाटिकेची गरज, अत्याधुनिक कॅमेरे, मानधन तत्त्वावर जंगलातील ढोल्यांची देखभाल करण्यासाठी याबरोबर कृत्रिम ढोल्या बनविण्यासाठी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे. धनेश पक्षी आणि जंगले किती गरजेची आहेत, याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘सह्याद्री संकल्प संस्थे’कडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा आणि संमेलन घेतली जातात. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी संस्थेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. या मोहिमेत आता धनेश निसर्ग मित्र सहभागी होऊ लागले आहेत. अशा संस्थेच्या कार्यात आपणदेखील हातभार लावणे गरजेचे झाले आहे. सह्याद्री संस्थेच्या विस्तारासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.