सर्वसामान्यांना पुन्हा झटका, चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठलेली असतानाच घरगुती गॅसच्या दरांमध्येही वाढ

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे, कारण एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती. देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे.

हे वाचले का?  “केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट”, नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र; म्हणाल्या, “आम्ही शिक्षणमंत्र्यांचा…”

२५ रुपयांची वाढ झाल्याने आता १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन दर आजपासून लागू होत आहेत. याआधी २५ फेब्रुवारी रोजी किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ झाली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढले होते.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे दर बदलतात. जानेवारी महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली नव्हती. पण फेब्रुवारीमध्येच एलपीजी गॅसच्या किंमती जवळपास १०० रुपयांनी वाढल्या. तर, डिसेंबर महिन्यात वाढलेले दर पकडून साधारण २०० रुपयांनी एलपीडी गॅस महाग झालाय. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठलेली असतानाच एलपीजीच्या दरांमध्येही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे.

हे वाचले का?  Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?