नाशिकमध्ये १,९०,८०० कुप्यांचे वितरण
नाशिकमध्ये १,९०,८०० कुप्यांचे वितरण
नाशिक : करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असताना अनेक ठिकाणी लशींचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर, विभागासाठी तातडीने तीन लाख ३३ हजार कुप्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध करण्यात आल्या. गुरुवारी नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत त्यांचे वितरण सुरू करण्यात आले. एक लाख ९० हजार ८०० कुप्या नाशिकला मिळणार आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने सरकारने लसीकरणाचा विस्तार करण्याचे निश्चित केले आहे. त्या अंतर्गत ४५ ते ६० या वयोगटातील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी नवीन टप्पा सुरू होत असताना पूर्वसंध्येला नाशिकसह अनेक ठिकाणी लशींचा पुरेसा साठा नसल्याचे समोर आले. मागणी आणि पुरवठय़ातील तफावत दूर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
देशात सर्वाधिक वेगाने करोनाचा प्रादुर्भाव होणाऱ्या जिल्ह्य़ांच्या यादीत नाशिक पाचव्या क्रमांकावर आहे. करोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्युदर कमी करण्यासाठी टाळेबंदी किंवा लसीकरण हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात दोन टप्प्यांत एकूण ४० लाख लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्राच्या आरोग्य सेवा संचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
नाशिक विभागासाठी बुधवारी तीन लाख ३३ हजार कुप्या मिळाल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.पी. डी. गांडाळ यांनी सांगितले. त्यातील ५४ हजार ७०० कुप्या नगरला लगेचच देण्यात आल्या. गुरुवारी नाशिक जिल्ह्यास एक लाख ९० हजार ८००, धुळे जिल्ह्य़ास ३३ हजार ५००, जळगावला ५४ हजार ७०० आणि नंदुरबारला २७ हजार कुप्या वितरणाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन साठा उपलब्ध झाल्यामुळे तूर्तास निर्माण झालेला तुटवडा दूर होण्यास हातभार लागणार आहे.
१४.२५ टक्के लसीकरण
नाशिक विभागास आतापर्यंत एकूण १२ लाख ६९ हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ११ लाख २३ हजार कोव्हिशिल्डच्या तर एक लाख ४६ हजार ३०० कोव्हॅक्सिनच्या आहेत. आरोग्य विभागाच्या ३१ मार्चच्या अहवालानुसार आतापर्यंत १४.२५ टक्के लसीकरण झाले आहे. म्हणजे विभागात आतापर्यंत तीन लाख ९९ हजार ६६९ जणांचे लसीकरण झाले. त्यात नाशिक जिल्ह्यात १५.७३, नंदुरबारमध्ये ८.५४, जळगाव १३.०६, धुळे जिल्ह्यात १४.३४ आणि नगर जिल्ह्यात १५.४८ टक्के लसीकरण झाले आहे. आधीच्या टप्प्यात नाशिकला मिळालेल्या तीन लाख ३२ हजार ७६० पैकी सुमारे पावणेतीन लाख कुप्यांचा वापर झाला. नंदुरबारमध्ये ७५ हजार ४५० पैकी ५५ हजार ११९, जळगाव जिल्ह्यात एक लाख ७७ हजार ३४० पैकी एक लाख ३८ हजार ७२७, धुळ्यात ९२ हजार २५० पैकी ७९ हजार ७५ आणि नगर जिल्ह्यात दोन लाख ५८ हजार ५०० पैकी एक लाख ७४ हजार ६१५ कुप्यांचा वापर झाल्याचे अहवालात म्हटले आहे.