नोव्हेंबर २०२० पासून जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नूतनीकरण व देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते.
तलासरीतील उद्योजकांना दिलासा; प्रदूषण नियंत्रण मंडळाची सशर्त परवानगी
पालघर : तारापूर येथील जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक निर्बंध घातले असले तरीसुद्धा हे प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर २०२० पासून जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नूतनीकरण व देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, काही उद्योगांकडून आम्लयुक्त सांडपाणी सोडल्याने तसेच या केंद्रातून योग्य पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी लादली होती.
या प्रक्रिया केंद्रातील साडेसात दशलक्ष लिटर क्षमतेच्या भागाचे नूतनीकरण देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून प्रक्रिया केंद्रातील या भागाला सुरू करून प्रक्रिया क्षमता साडेबारा दशलक्ष घनमीटर प्रतिदिनपर्यंत वाढवण्याची अनुमती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या परवानगीत उल्लेखित आहे. जुने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची अनुमती दिल्याने या परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे उद्योगांना दिलासा मिळणार आहे. तारापूर एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटीने सुरू केलेल्या नवीन सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र १८० ते २०० उद्योग जोडले गेले असून सध्या नवीन प्रकल्प २५ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन या क्षमतेने कार्यरत आहे.
कडक निर्बंध
सांडपाणी प्रक्रिया केंद्रात उद्योगांकडून पाणी स्वीकारताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून संबंधित उद्योगाकडे सांडपाणी सोडण्यासाठी एकच मार्ग असल्याचे व त्या मार्गावर जाळी, नॉन रिटर्न वॉल तसेच संबंधित संपूर्ण व्यवस्था टाळेबंद ठेवण्याचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सांडपाण्याची मात्रा व दर्जा ऑनलाइन पद्धतीने तपासण्यासाठी व त्याची सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला माहिती देण्यासाठी व्यवस्था असण्याबाबतदेखील व्यवस्था पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. ज्या उद्योगांमध्ये अधिक प्रमाणात सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड)ची निर्मिती होते त्याकरिता स्वतंत्र सांडपाणी प्रकियेची व्यवस्था उभारण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.