सात दिवसांत चार हजार पर्यटकांची जलसफर

औपचारिकरित्या उद्घाटनानंतर क्लबची कार्यवाही पूर्णत्वास जात असतानाच सत्ताबदल झाला.

बोटिंग क्लबला प्रतिसाद

नाशिक : करोनामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना निर्बंध शिथिलीकरणाच्या प्रक्रियेत विरंगुळा मिळावा म्हणून दीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने येथील गंगापूर धरण जलाशयात बोटिंग क्लब सुरू करण्यात आला. अवघ्या सात दिवसांत या ठिकाणी चार हजार पर्यटकांनी जलसफारीचा आनंद घेतला आहे.

जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळांचा विकास या संकल्पनेअंतर्गत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याने गंगापूर धरण परिसरात अत्याधुनिक बोटिंग क्लब सुरू करण्यात आला. औपचारिकरित्या उद्घाटनानंतर क्लबची कार्यवाही पूर्णत्वास जात असतानाच सत्ताबदल झाला. भाजप सरकारच्या काळातही बोटिंग क्लबचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. प्रकल्प सात वर्षांच्या कालावधीत नाशिककरांसाठी खुला झाला नाही. अखेर डिसेंबर २०२० मध्ये ऑनलाइन पद्धतीने बोटिंग क्लबचे उद्घाटन करण्यात आल्यावर प्रकल्प पर्यटकांसाठी खुला झाला. वर्षभरापासून घरात अडकलेल्या नागरिकांना विरंगुळा मिळावा म्हणून बोटिंग क्लब महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे येथील पर्यटकांच्या आकडेवारीवरून लक्षात येते. डिसेंबरपासून आतापर्यंत बोटिंग क्लबला ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. सुरुवातीला ही संख्या दिवसाला ६०० ते ७०० च्या घरात होती. क्लबमध्ये प्रवेशासाठी ७० रुपये शुल्क आकारण्यात येते. धरण परिसरालगत असलेले स्थानिक बेरोजगार, विशेषत: आदिवासी युवकांना बोटी कशा चालवायच्या याचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील ३५ हून अधिक युवकांना प्रशिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासाची माहिती दिली जात आहे. हे युवक धरण परिसरात पाश्चात्त्य बनावटीच्या ११ बोटी चालवत आहेत.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना सिंधुदुर्ग येथील प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात येत आहे. त्यांना स्कु बासह अन्य सागरी खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. मागील आठवडय़ात नाशिकसह पुणे, मुंबई, गुजरातमधील चार हजार पर्यटकांनी भेट दिली. नाशिकमधील पर्यटन स्थळांच्या यादीत बोटिंग क्लब अग्रस्थानी येत असताना करोनाचे सावट कायम आहे.

दरम्यान, जिल्ह्य़ात पावसाने ओढ दिली आहे. धरणाची पाण्याची पातळी सद्य:स्थितीत कमी असल्याने पर्यटकांना जलसफारीचा आनंद लुटता येत आहे. यामध्ये स्कूबा, बोटिंगसह अन्य जलक्रीडांचा आनंद घेता येत आहे. याविषयी बोलताना क्लबचे सारंग कुलकर्णी यांनी बोटिंग क्लब हा पर्यटकांना उत्तम पर्याय मिळाला असल्याचे सांगितले. लोक घरात राहून कंटाळले आहेत. त्यांना खुप छान वेळ या ठिकाणी घालवता येत आहे. करोना संसर्ग लक्षात घेता या ठिकाणी करोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केले जात आहे. दुसरीकडे, धरणाच्या पाण्याच्या पातळीवर पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून आहे. धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असेल तेव्हा हा प्रकल्प काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी नमूद के ले. पर्यटकांची संख्या वाढत असताना या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.