सावधान.. आपल्या भागातील पाणी शुद्ध आहे काय? राज्यात किती नमुने दूषित पहा..

राज्यात ७६ हजार ८६७ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३ हजार ५८० पाणी नमुने दूषित आढळले.

नागपूर : राज्यात ७६ हजार ८६७ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ४.६५ टक्के नमुने दूषित आढळले आहे. त्यामुळे पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात जलजन्य आजारांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाणी स्त्रोतांचे प्रभावी गुणवत्ता नियंत्रण करण्यात येत आहे. विरंजक चूर्णाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. राज्यात ७६ हजार ८६७ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३ हजार ५८० पाणी नमुने दूषित आढळले. राज्यात दरवर्षी मान्सूनपूर्व सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचा सॅनिटरी सर्वे करण्यात येतो. त्यानुसार प्रत्येक गावाला हिरवे, पिवळे व लाल कार्ड दिले जाते. त्यानुसार राज्यात २७ हजार ८५३ गावांचा सर्व्हे झाला. यामध्ये २४ हजार १३९ गावांना हिरवे कार्ड, ३ हजार ६७५ गावांना पिवळे कार्ड आणि ३९ गावांना लाल कार्ड दिले गेले. 

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

साथरोग निदानासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा सज्ज आहे. पावसाळ्यातील विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध केला आहे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, जोखमीच्या भागात कीटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर, डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाण्या, खिडक्यांना जाळ्या बसविणे व डास प्रतिरोधक क्रीम आदी एकात्मिक किटक व्यवस्थापन कार्यक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नागरिकांनी या काळात सर्व गृहनिर्माण सोसायटीमधील पंपवेल व पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सफाई करून घ्यावी, शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नये, हातगाड्यावर, उघड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नये, प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे, उलट्या-जुलाब, विषमज्वर वगैरे विकार झाल्यास वेळीच उपचार घ्या, पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून प्यावे, नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरावेत व पाण्याचे साठे झाकून ठेवावेत, कुलर्स, रेफ्रिजरेटर्स  यातील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलावे, पूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करावा.

हे वाचले का?  Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”