राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून, राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे.
पुणे : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून, राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. राज्यात यंदा २७ जुलैपर्यंत असे ३९ हजार ४२६ रुग्ण सापडले असून, त्यातील ७ हजार ८७१ रुग्ण पुण्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात पुण्यानंतर बुलढाण्यात मोठ्या संख्येने डोळ्याच्या साथीचे रुग्ण सापडले आहेत. बुलढाण्यात ६ हजार ६९३ रुग्ण आढळले असून, अमरावती २ हजार ६११, गोंदिया २ हजार ५९१, धुळे २ हजार २९५, जालना १ हजार ५१२, वाशिम १ हजार ४२७, हिंगोली १ हजार ४२५, नागपूर महापालिका १ हजार ३२३, अकोला १ हजार ३०६, यवतमाळ १ हजार २९८, परभणी १ हजार १०९, जळगाव १ हजार ९३ अशी रुग्णसंख्या आहे. सर्वांत कमी रुग्णसंख्या रायगडमध्ये असून, तिथे केवळ एक रुग्ण सापडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ३२४ रुग्ण आढळले आहेत.
सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला डोळ्यांची साथ येण्याचे प्रमाण वाढले आहे. याच महिन्यात आळंदी परिसरात डोळ्याच्या साथीचे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. यानंतर जिल्हा परिषदेने त्या परिसरातील शाळांमध्ये मुलांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. आळंदी परिसरातून राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रुग्णांचे नमुने गोळा केले होते. त्यांची तपासणी करून आरोग्य विभागाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
रुग्णांना नेमक्या कशामुळे हा त्रास होत आहे, हे तपासण्याची आवश्यकता आरोग्यतज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. डोळ्यांना संसर्ग हा जीवाणू, विषाणू की ॲलर्जीमुळे झाला, हे तपासण्याची आवश्यकता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डोळ्याच्या साथीचे प्रमाण जात असल्याचेही आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
डोळे येण्याची लक्षणे
- डोळे लाल होणे
- वारंवार पाणी येणे
- डोळ्याला सूज येणे
अशी घ्या काळजी…
- वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
- वारंवार हात धुणे
- डोळ्यांना हात न लावणे
- डोळे आलेल्या व्यक्तीचे घरातच विलगीकरण
- परिसर स्वच्छ ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे
डोळ्याची साथ वाढू लागल्याने महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची डोळे तपासणी १ ऑगस्टपासून केली जाणार आहे. – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका