सावरकर थीम पार्कसह संग्रहालयासाठी पाच कोटींचा निधी, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भगूर येथे त्यांच्या विचार दर्शनावर आधारीत थीम पार्क आणि संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भगूर येथे त्यांच्या विचार दर्शनावर आधारीत थीम पार्क आणि संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भगूर येथे सावरकर संस्कार तीर्थ परिक्रमा आखण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

भगूर येथे सावरकर यांच्या जन्मस्थानी लोढा यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारच्या वतीने काही घोषणा करण्यात आल्या. लोढा यांनी थीम पार्क आणि संग्रहालयासाठी निधी मंजूर केला आहे. सावरकर संस्कार तीर्थ परिक्रमेत भगूर त्यानंतर पुणे, सांगली, रत्नागिरी आणि मुंबई अशा स्थळांचा समावेश राहणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. सावरकरांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व जीवनकार्य भारतातच नव्हे तर, जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत सावरकरांच्या जन्मस्थानी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय आणि थीम पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. भगूर येथील अनेक वर्षे अपूर्णावस्थेत असलेले थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आपल्याकडे हस्तांतरीत करून घेतले आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

दरम्यान, सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे अभिवादन पदयात्रा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी अभिवादन यात्रा काढण्यात आली. येथील अष्टभुजा देवीची पालखीही यात सहभागी झाली. अभिवादन यात्रेच्या समारोपप्रसंगी चारूदत्त दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावरकरांवरील गीते सादर केली. योगेश सोमण लिखित व दिग्दर्शित सावरकर आणि मृत्यू या नाटकाचे अभिवाचन झाले.

हे वाचले का?  उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, दिवाळी खरेदीच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत

वीर सावरकर पर्यटन सर्किट

वीर सावरकर यांचे जीवनकार्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी पर्यटन सर्किट निर्मिती करण्यात आली आहे. सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. भगूर येथील त्यांच्या जन्मस्थानासह नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, पुणे येथील सावरकर अध्यासनातील सामाजिक समरसतेचे प्रतीक अर्थात पतितपावन मंदिर, मुंबई येथील सावरकर सदन, सावरकर स्मारक अशी शृखंला तयार केली आहे.

हे वाचले का?  नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार