साहित्य संमेलनाच्या हिशेब विलंबावरून प्रश्नांची सरबत्ती

लोकहितवादी परिवाराच्या वतीने शहर परिसरात मराठी भवन उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

स्वागत समितीचे सदस्य श्रीकांत बेणी यांचा पुढाकार

नाशिक : लोकहितवादी परिवाराच्या वतीने शहर परिसरात मराठी भवन उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी परिवाराच्या वतीने साहित्य संमेलनाचा अजूनही देण्यात आलेला नसल्याने त्वरित हिशेब देण्यात यावा, अशी मागणी साहित्य संमेलनातील स्वागत समितीचे सदस्य श्रीकांत बेणी यांनी केली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात तीन ते पाच डिसेंबर या कालावधीत पार पडले. संमेलनास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी परिवाराच्या वतीने संमेलनाचा हिशेब जाहीर करण्यात आलेला नाही. हिशेब तयार करुन स्वागत समितीच्या बैठकीत तो सनदी लेखापालांकडून मंजुरीसाठी सादर करणे अपेक्षित असताना हिशेबाऐवजी लोकहितवादी परिवार मराठी भवनचे आमिष नाशिककरांना दाखवत आहे, अशी टीका बेणी यांनी केली आहे.

लोकहितवादीचे जयप्रकाश जातेगांवकर यांच्या एककल्ली कारभारावर साहित्य महामंडळाचे प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनीही आक्षेप नोंदवला होता. संमेलनात राजकीय नव्हे तर, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. लोकहितवादीने स्वागत समितीचे किती सदस्य केले, ते हिशेब आल्यावर समजेल. संमेलनासाठी राज्य शासनाकडून प्राप्त निधी, आमदारांकडून आलेला निधी, जिल्हा नियोजन मंडळ, नाशिक महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, जिल्ह्यातील सहकारी बँका आदींच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात आला. ही रक्कम कोटय़वधींच्या घरात आहे. याशिवाय शहरातील नामांकित संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. या व्यतिरिक्त स्वागत समिती शुल्क, पुस्तक प्रदर्शन, संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्क या माध्यमातून निधी मिळाला आहे. हा जमा झालेला निधी कोणकोणत्या गोष्टीवर खर्च झाला, याविषयी नाशिककरांना उत्सुकता असल्याचे बेणी यांनी नमूद केले आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

संमेलनाच्या मांडवावर, जेवणावळ, करमणुकीच्या कार्यक्रमांवर आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रांवर किती खर्च झाला, याचा हिशेब लोकहितवादीने दिला पाहिजे. शासकीय पाठबळ नसताना १५ वे विद्रोही साहित्य संमेलन काही लाखांमध्ये पार पडले. आयोजकांनी त्याचा हिशेबही जाहीर केला. मग शासकीय यंत्रणा दिमतीला असताना लोकहितवादीकडून हिशेब जाहीर करण्यास विलंब का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही बेणी यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

‘लोकहितवादी’च का?

संमेलनाचा हिशेब देण्याऐवजी लोकहितवादी परिवाराच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मदतीने शहरात मराठी भाषा भवन उभारण्याचे आमिष दाखवले जात आहे. मुक्त विद्यापीठ यासाठी सक्षम असून सहकार्यासाठी प्रदीर्घ साहित्य परंपरा असलेली सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्था मदत करू शकते. ‘लोकहितवादी’ची गरज काय? वास्तविक मराठी भाषा भवन उभारण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. संमेलनात असा ठराव झाला. परंतु, प्रस्ताव लोकहितवादीचा हा दावा चुकीचा आहे. मंडळाने याबाबत शासनाला प्रस्ताव सादर करताना भवनाचे कार्यकारी अध्यक्ष आणि सचिव हे लोकहितवादी मंडळाचे असतील हे नमूद केले. कार्यकारी अध्यक्षाची सूत्रे जातेगावकर यांच्याकडे असतील. शहरात रमेश वरखडे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, प्रा. एकनाथ पगार, गो. तु. पाटील, प्रा. दिलीप फडके, प्रा. वृन्दा भार्गवे असे भाषातज्ज्ञ असताना जातेगावकर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

पुढील आठ दिवसांत हिशेब पूर्ण

नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हिशेब लवकरच दिला जाईल. यासाठी वेगवेगळय़ा विभागांकडून माहिती मागविण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. विद्रोहीच्या तुलनेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पसारा मोठा आहे. यामुळे कामास उशीर होत आहे.

– चंद्रकांत दीक्षित (कोषाध्यक्ष, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)