साहित्य संमेलनात पहिल्यांदाच बालसाहित्य मेळावा

साहित्यिक गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन उपासनी यांनी केले.

सहभाग वाढविण्यासाठी नाशिकमधील शिक्षण संस्थांना आवाहन

नाशिक : शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिले वर्ष वगळता ९३ वर्षात प्रथमच बाल साहित्य मेळावा होणार आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि मेळाव्यात बालकांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येत असून मेळाव्यासाठी शिक्षण संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

साहित्य संमेलनाअंतर्गत बाल मेळावा होणार असल्याने त्याविषयी नाशिकचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांची बैठक झाली. बैठकीस नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी मार्गदर्शन करतांना साहित्य संमेलनात बाल मेळावा आयोजनाचा मान वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला असून ही नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत यासाठी, तसेच त्यांच्या साहित्यिक गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन उपासनी यांनी केले.

हे वाचले का?  मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार

संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून नाशिक ही मंत्रभूमी ते तंत्रभूमी आणि आता साहित्य, शिक्षणभूमी म्हणून नाव कमावलेली भूमी असल्याने संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्व शिक्षण संस्था भक्कमपणे पाठीशी उभ्या राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गोखले शिक्षण संस्थासारख्या नाशिकच्या अग्रगण्य संस्थेने आपली जागा संमेलन स्थळ म्हणून तसेच कार्यालयासाठीही उपलब्ध करून दिली आहे. संदिप फाउंडेशन आणि भुजबळ नॉलेज सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्था सहकार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. अजूनही इतर संस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे.  याशिवाय प्रत्येक संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त संख्येने बाल साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जातेगावकर यांनी केले. माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी शैक्षणिक संस्था आणि शाळा ज्याप्रमाणे शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात, त्याप्रमाणे त्यांनी नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनाला भेट देण्याचा उपक्रम राबविण्याची सूचना के ली. अशा उपक्र मामुळे उद्याचे साहित्यिक घडण्याचे बीज रोवले जाईल. नाशिक मनपा हद्दीतील शाळा, तसेच तालुक्यातील शाळांनी दिवस निवडून आपल्या निवडक शिक्षक, विद्यार्थ्यांना संमेलनाला पाठविले तर संमेलन सर्वसमावेशक आणि लाभदायी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

बैठकीस प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर, उपशिक्षण अधिकारी नीलेश पाटोळे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक  ए. एम. बागुल, संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर, बाल मेळावा समिती प्रमुख संतोष हुदलीकर, गोखले शिक्षण संस्थेतील प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी हेही उपस्थित होते.  प्रारंभी बाल मेळावा प्रमुख हुदलीकर यांनी प्रास्ताविकातून बाल मेळाव्याची माहिती दिली. कार्यवाह करंजकर यांनी आभार मानले.

हे वाचले का?  नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद