सुपरनोव्हाज, गतउपविजेता व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या तीन संघांमध्ये चार सामन्यांचा थरार रंगणार आहे.
महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून शारजात सुरुवात होत असून सुपरनोव्हाज संघाने सलग तिसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य बाळगले आहे. करोनाची भीती तसेच बिग बॅश लीगच्या तारखा यामुळे भारतीय क्रिकेट संघातील अव्वल खेळाडू आणि इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजमधील क्रिके टपटूंमध्ये महिलांचे तिसरे पर्व रंगणार आहे.
सुपरनोव्हाज, गतउपविजेता व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स या तीन संघांमध्ये चार सामन्यांचा थरार रंगणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी अंतिम लढत होणार असून या तीन संघांमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचाही समावेश असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाजने अप्रतिम कामगिरी करत गेल्या दोन्ही पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांना पहिल्याच सामन्यात मिताली राज कर्णधार असलेल्या व्हेलोसिटी संघाचा सामना करावा लागेल. हरमनप्रीतने गेल्या पर्वात दोन अर्धशतके झळकावली होती. अंतिम फे रीत तिने ३७ चेंडूंत केलेली ५१ धावांची खेळी सुपरनोव्हाजला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची ठरली होती. सुपरनोव्हाजच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या कामगिरीकडेही सर्वाचे लक्ष असेल. जेमिमाने गेल्या पर्वात १२३ धावा करत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
व्हेलोसिटीला गेल्या पर्वात अखेरच्या षटकांत चार गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. व्हेलोसिटीची मदार १६ वर्षीय युवा फलंदाज शफाली वर्मा हिच्यावर असेल. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत शफालीने नऊ षटकार ठोकत सर्वाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे व्हेलोसिटीला तिच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. त्याचबरोबर वेलोसिटी संघात वेदा कृष्णमूर्ती, एकता बिश्त, शिखा पांडे या भारतीय क्रिके टपटूंसह डॅनियल वॅट हिचा समावेश आहे.
* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.