सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान मोदींकडे केलेल्या मागणीवरून अजित पवार गटाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे.
महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी ( १८ सप्टेंबर ) केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीपीला ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हणताना सिंचन आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख केला होता, असा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी चौकशीसाठी भाजपाला आव्हान दिलं. यावरून खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
पंतप्रधान मोदींना उद्देशून सुप्रिया सुळेंनी म्हटलं, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबाबत तुम्ही कोणतीही चौकशी करा. आम्ही त्याला १०० टक्के पाठिंबा देऊ. कारण, मला आठवतंय पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक विधान केलं होतं की, एनसीपी ही ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आहे. त्यांनी दोन घोटाळ्यांचा आरोप केला होता. एक म्हणजे सिंचन आणि दुसरा बँक घोटाळा. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते की, पंतप्रधान मोदींची जी इच्छा आहे, ती पूर्ण करा.”
“आम्ही पूर्ण ताकदीने पंतप्रधानांबरोबर उभं राहू”
“तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता, कृपया त्याची चौकशी करा. हे केवळ दोनच घोटाळे नाहीत, इतरही काही घोटाळे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी नातेसंबंधाबाबत बोलत नाही. संसदेत माझे ८०० भाऊ आहेत. माझा केवळ एकच भाऊ थोडी आहे. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत जी तळमळ आहे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात जे काही करायचं आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“…हे विधान टाळता आलं असतं”
यावरून सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे. “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आलेलं नैराश्य अद्यापही दूर झालेलं दिसत नाही. याबाबत चौकशी पूर्ण झाली असून, न्यायालयाचे निर्णयही झाले आहेत. वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशाप्रकारची वक्तव्य येतात. हे विधान टाळता आलं असतं,” असं टीकास्र सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर सोडलं.
“आमच्या निर्णयाला समर्थन मिळतंय”
“अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमागे सर्व महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यही अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला समर्थन मिळत आहे,” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.