सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठीचा डंका! सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस

देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे.

देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ललीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवलं.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

लळीत ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली.

धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

कोण आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश होते.