सौदीने भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर वगळलं; नकाशात बदल केला नाही तर…

नोटेवर छापण्यात आला आहे हा वादग्रस्त नकाशा

सौदी अरेबियाने जारी केलेल्या एका नकाशामध्ये भारताचा अविभाज्य भाग असणारा जम्मू-काश्मीर आणि लडाखचा प्रदेश वगळल्याबद्दल भारताने कठोर शब्दामध्ये निषेध नोंदवला आहे. सौदी अरेबियाने हा वादग्रस्त आणि चुकीचा नकाशा जी २० देशांच्या परिषदेच्या निमित्ताने २० रियालच्या चलनी नोटेवर छापला आहे. मात्र हा नकाशा चुकीचा असल्याचे सांगत भारताने या चुकीच्या नकाशासंदर्भातील मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. सौदी अरेबियाने नकाशामध्ये बदल केला नाही तर भारत पुढील महिन्यात होणाऱ्या जी २० परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर २० रियाची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये एका बाजूला सैदीचे राजे सलमान आणि जी२० सौदी परिषदेचा लोगो छापण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला जागतिक नकाशा छापून त्यामध्ये जी २० मध्ये कोणते देश आहेत हे दर्शवण्यात आलं आहे. मात्र या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर हे स्वतंत्र प्रदेश दाखवण्यात आले आहेत. या नकाशामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानचा प्रदेशही दाखवण्यात आलेला नाही.

हे वाचले का?  छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश

पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या अमझद आयुब मिर्झा यांनी हा नकाशामध्ये पाकिस्तानसाठी मोठा धक्का असल्याचे म्हणत सौदीने जारी केलेल्या नकाशाचा फोटो ट्विट केला आहे. “सौदी अरबने पाकिस्तानच्या नकाशामधून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलिगिट आणि बाल्टिस्तानचा प्रदेश काढून टाकला आहे,” असं मिर्झा यांनी म्हटलं आहे.

मात्र नवी दिल्लीतील भारतीय अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियाने जारी केलेला नकाशा पाहिला तेव्हा भारताच्या नकाशामध्येही फेरफार करण्यात आल्याचे लक्षात आलं अशी माहिती इंडिया टुडे टीव्हीला सुत्रांनी दिली. भारताने यासंदर्भात दिल्लीतील सौदी अरेबियाच्या राजदुतांकडे तक्रार नोंदवली आहे. तर रियाधमधील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयानेही सौदी अरेबियातील संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात आक्षेप नोंदवला असून ही चूक गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

बुधवारीच भारताने यासंदर्भातील तक्रार नोंदवल्यानंतर आता रियाधमधून याला काय उत्तर येते याची वाट पाहिली जात असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. भारत हा जी २० परिषदेचा सदस्य असून पाकिस्तानचा या २० देशांच्या संघटनेत समावेश नाहीय. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी जी-२० देशांची परिषद रियादमध्ये होणार आहे. जर सौदीने हा नकाशा बदलला नाही तर भारत या परिषदेमध्ये सहभागी होणार नसल्याचे समजते.

मागील काही कालावधीमध्ये भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध बरेच सुधारले असून दोन्ही देश मित्रराष्ट्र आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रियादला भेट दिली होती. यावेळी भारत आणि सौदीमध्ये झालेल्या करारानुसार सौदीच्या व्हिजन २०३० अंतर्गत भारत हा सहकारी देश असेल असं सौदीच्या राजांनी म्हटलं होतं. दोन्ही देशांच्या नेत्यांनी संबंध अधिक सुदृढ करण्यासंदर्भात चर्चा केली होती.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

जी २० मध्ये कोणते देश आहेत?

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मॅक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, टुर्की, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपीय युनियन