स्टील कंपन्यांच्या ३०० कोटींचा बेहिशेबी व्यवहार ; जालन्यातील चार कंपनीच्या ३२ ठिकाणी छापे

चार कंपन्यांची कार्यालये औरंगाबाद, पुणे, मुंबई व कोलकता येथेही आहेत.

जालना येथील चार प्रमुख स्टील कंपन्यांकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची बेहिशेबी नोंदी असल्याचे आयकर खात्याच्या लक्षात आल्यानंतर, सोमवारी या कंपन्यांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. सळया उत्पादक कपंन्यांनी स्टील भंगार आणि उत्पादन नोंदीमध्ये घोळ घालून काही बनावट कंपन्यांच्या नावाने कोट्यवधीचे व्यवहार केले. त्यामुळे जालना, औरंगाबाद, पुणे येथे ३२ ठिकाणी सोमवारी छापे टाकण्यात आले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

बेहिशेबी संपत्ती आणि व्यवहाराची ही रक्कम २०० कोटींच्या घरात असावी असा आयकर विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज होता. पण कंपनीच्या परिसरात बराच कच्चा माल विनानोंदीचा होता. त्यामुळे हा व्यवहार आणखी १०० कोटी रुपये वाढेल असा आयकर विभागाचा अंदाज असल्याचे आयकर विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जालना येथील या चार कंपन्याची नावे न देता आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला असून सोमवारी टाकण्यात आलेल्या छाप्यात बेहिशेबी संपत्तीशी संबंधित कागदपत्रे तसेच डिजिटल कागदपत्रे उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या या व्यवहारातील १२ बँकांच्या तिजोरीतील रोख रक्कमही समोर आली असून, ती दोन कोटी १० लाख रुपये एवढी आहे. ७१ कोटी रुपये अतिरिक्त नफा मिळविल्याचे कंपनी व्यवस्थापनाने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर कबुल केले आहे. अजुनही तपास सुरू असून या चार कंपन्यांची कार्यालये औरंगाबाद, पुणे, मुंबई व कोलकता येथेही आहेत. जालना शहरातील या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.