स्थायी सभापतीपदी भाजपचे गणेश गिते

महापालिकेची तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यात सत्ताधारी भाजपला यश आले.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महापालिकेची तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यात सत्ताधारी भाजपला यश आले. समसमान संख्याबळ असूनही विरोधकांमध्ये बिघाडी झाली. घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. मनसेने भाजपसोबत राहण्याचे जाहीर केले. या एकंदर स्थितीत स्थायी सभापतीपदी भाजपचे गणेश गिते यांची बिनविरोध निवड झाली.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

स्थायी समिती सभापतीपदासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी केवळ गिते यांचा अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. शिवसेनेचे पाच सदस्य निवडणूक प्रक्रियेपासून तटस्थ राहिले. ते सभागृहातही आले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे सदस्य उपस्थित होते. मनसेने आधीच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेने तटस्थ राहण्याचे ठरविल्याने भाजपच्या गिते यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. प्रारंभी शिवसेना भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत होती. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य सोबत येतील की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली. अखेर शिवसेनेला तटस्थ राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेवर आरोप केले. दरम्यान, स्थायी समिती राखण्यात यश मिळाल्याचा भाजपकडून आनंदोत्सव साजरा झाला. सभापती गिते यांच्या स्वागतावेळी अनेक पदाधिकाऱ्यांना करोनाच्या नियमांचा विसर पडला.