स्पेस एक्सच्या अवकाश कुपीतून ४ नागरीक ३ दिवस पृथ्वी प्रदक्षिणा करणार, अवकाश सफरीचा आनंद लुटणार
अवकाशात समानवी मोहिम आखणारी पहिली खाजगी कंपनी अशी ओळख असलेल्या ‘स्पेस एक्स’ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत अंतराळवीर तसंच आवश्यक ‘कार्गो’ ची ने – आण करण्याचे काम अमेरिकेची स्पेस एक्स कंपनी करत होती. आता स्पेस एक्स कंपनी अवकाश पर्यटनाला सुरुवात करत आहे. येत्या १५ सप्टेंबरला चार नागरीक स्पेस एक्सच्या ‘अवकाश कुपी’तून ३ दिवसांच्या अवकाश सफरीकरता रवाना होणार आहेत. Inspiration4 असं या मोहिमेचे नाव असणार आहे. अमेरिकेतील अब्जाधीश जरेड इसाकमॅन हे या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.
Inspiration4 मोहिमेची तयारी जोरात सुरू असून सुमारे १२ टन वजनाची अवकाश कुपी ही Falcon 9 या रॉकेटद्वारे अवकाशात झेपावणार आहे. या अवकाश कुपीत ३८ वर्षीय जरेड इसाकमॅनसह इतर तिघे जण प्रवास करतील. ही अवकाश कुपी पृथ्वीपासून सुमारे ५९० किलोमीटर उंचीवरून १७ हजार किलोमीटर प्रति तास या प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती ३ दिवस फिरत रहाणार आहे. १८ सप्टेंबरला अटलांटिक समुद्रात पॅराशूटच्या सहाय्याने ही अवकाश कुपी उतरेल असं नियोजन आहे. या तीन दिवसात माणसाच्या रक्तदाबापासून विविध वैद्यकीय प्रयोग -निरीक्षणे केली जाणार आहेत. या माहितीचा उपयोग भविष्यातील समानवी अवकाश मोहिमांकरता होणार आहे.
याआधी जुलै महिन्यात अमेरिकेतील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन खाजगी कंपन्यांनी अवकाश सफर मोहीमा यशस्वी केल्या होत्या. व्हर्जिन गेलेक्टिक कंपनीचे अब्जाधीश रिचर्ड ब्रॅनसोन यांनी 3 प्रवाशांसह अवकाश सफर केली होती. एका विमानाच्या माध्यमातून दोन मिनिटे त्यांनी पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ८० किलोमीटर उंचीवर प्रवास केला होता. तर ब्लु ओरिजिनचे अब्जाधीश जेफ बेझोस यांनी १०७ किलोमीटर उंची गाठत ३ प्रवाशांसह ३ मिनिटांची अवकाश सफर केली होती. Inspiration ४ मोहिमेचे वैशिष्ट्य हे असणार आहे की अवकाश कुपीतून तब्बल ३ दिवस पृथ्वीभोवती प्रवास तोही ५९० किलोमीटर उंचीवरून केला जाणार आहे. यामुळे Inspiration ४ मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. ४ नागरिक हे अंतराळवीर म्हणून ३ दिवस शून्य गुरुत्वाकर्षण अवस्थेत पृथ्वीबाहेर अवकाश कुपीत रहाणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अवकाश पर्यटनाला सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी किती पैसे मोजावे लागले हे अजून स्पष्ट झाले नसले तरी काही मिलियन डॉलर्स ( कोट्यावधी रुपये) एवढा खर्च निश्चितच होणार आहे.