स्पेस डॉकिंगसाठी ‘इस्रो’ सज्ज, उपग्रहांचे यशस्वी उड्डाण, आता चाचणीची प्रतीक्षा

दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसाद करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
पीटीआय, श्रीहरीकोटा (आंध्रप्रदेश)
दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसाद करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या ‘स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट’साठी (स्पाडेक्स) दोन उपग्रह सोमवारी अंतराळ प्रक्षेपण तळावरून झेपावले. हे उपग्रह आपापल्या कक्षेत स्थिरावले असून येत्या काही दिवसांत त्यांच्यातील अंतर कमी करून ते एकमेकांना जोडण्याची चाचणी केली जाणार आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा तसेच उपग्रहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्र विकसित करणारा भारत हा जगातील चौथा देश होईल.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!

‘पीएसएलव्ही सी-६०’ या प्रक्षेपकाच्या मदतीने या दोन उपग्रहांसह अन्य काही उपग्रह सोमवारी रात्री १० वाजता झेपावले. त्यानंतर १५ मिनिटांनी ते भूपृष्ठापासून ४७५ कोलीमीटर उंचीवर आपल्या नियोजित कक्षेत स्थिरावले. याबाबत माहिती देताना मोहिमेचे संचालक एम. जयकुमार म्हणाले की, ‘स्पाडेक्स’मध्ये वापरले जाणारे दोन्ही उपग्रह एकमेकांच्या मागे असलेल्या आपल्या नियोजित कक्षेत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत त्यांच्यातील अंतर कमी होईल. त्यांच्यातील अंतर २० किलोमीटरवर आल्यानंतर त्यांच्या जोडणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. एखाद्या आठवड्यात ही प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा असून साधारणत: ७ जानेवारीची तारीख गृहित धरण्यात आली आहे.प्रयोग काय?

हे वाचले का?  दीड वर्षात विक्रमी सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती, ७१ हजारहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र

‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार स्पेसक्राफ्ट ए (एसडीएक्स०१) किंवा ‘चेसर’ आणि स्पेसक्राफ्ट बी (एसडीएक्स०२) किंवा ‘टार्गेट’ या उपग्रहांवर हा प्रयोग केला जाणार आहे. जमिनीपासून ४७० किलोमीटर उंचीवरून प्रवास करताना हे दोन्ही उपग्रह एकमेकांना जोडले जाणार आहेत. भविष्यातील चंद्रयान मोहिमा, तेथील नमूने पृथ्वीवर आणणे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची उभारणी, मानवी अंतराळ मोहिमा यासाठी हे तंत्रज्ञान अत्यावश्यक मानले जाते.

जगातील चौथा देश

हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश असेल. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनच्या अंतराळ संशोधन संस्थांकडेच हे तंत्र आहे. अत्यंत महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांसाठी या तंत्रज्ञानाची भविष्यात ‘इस्रो’ला मदत होणार आहे.